पोलीस पुत्रासह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:06 IST2019-03-13T23:37:41+5:302019-03-14T00:06:11+5:30
कुटुंबाला नुकसान पोहोचविण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस पुत्रासह त्याच्या मित्राविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पुत्रासह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल
नाशिकरोड : कुटुंबाला नुकसान पोहोचविण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस पुत्रासह त्याच्या मित्राविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१५ मध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीची मैत्रिणीमुळे यश विजय गांगुर्डे (वय २५) रा. नाशिकरोड पोलीस लाइन याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर २०१६ मध्ये संशयित यश याने त्या मुलीला नाशिकरोड पोलीस लाइन येथे पडक्या घरात नेऊन तुझ्या भावास काही पण करेल अशी धमकी देत तिच्यावर वारंवार जबरदस्ती केली. तसेच अश्लील फोटो फेसबुकला टाकण्याची धमकी दिली. मुलीने यश सोबत जाण्यास नकार दिल्यावर तुझ्या घरी येऊन तमाशा करेन, सोसायटीच्या लोकांना सांगून बदनामी करेन अशी धमकी दिली. गेल्या १६ फेब्रुवारी रोजी यश याने पुन्हा त्या मुलीला पडक्या खोलीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर १८ फेब्रुवारीला यशचा मित्र गणेश भामरे (३०) याने त्या मुलीला सीबीएसला बोलावून रिक्षाने सिडकोत त्रिमूर्ती चौक येथे एका फ्लॅटमध्ये नेऊन भावाला मारण्याची धमकी देत जबरदस्ती केली. पीडित मुलगी गेल्या ५ मार्च रोजी घराजवळ रात्री ८ वाजता शतपावली करत असताना यश याने पुन्हा पोलीस लाइनमधील पडक्या घरात नेऊन बांधून ठेवून जबरदस्ती करून दुसऱ्या दिवशी सकाळी सीबीएस येथे सोडून घरच्यांना सांग पुण्याला गेली होती असे सांगून निघून गेला.
पीडित मुलगी सीबीएसजवळ एकटी उभी असताना पोलिसांनी तिची विचारपूस करून वडिलांशी फोनवरून बोलणे करून दिले. मुलगी घरी न आल्याने वडिलांनी उपनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली होती. पोलिसांनी पीडित मुलीला निर्भया व्हॅनमधून उपनगर पोलीस ठाण्यात पाठविले. त्यानंतर वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.