अपहरण प्रकरणातील १३ आरोपींना पोलीस कोठडी
By Admin | Updated: January 21, 2016 23:05 IST2016-01-21T23:02:54+5:302016-01-21T23:05:46+5:30
अपहरण प्रकरणातील १३ आरोपींना पोलीस कोठडी

अपहरण प्रकरणातील १३ आरोपींना पोलीस कोठडी
येवला : तालुक्यातील दोन युवकांची येवला-शिर्डी रस्त्यावरून तीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी ६० तासांच्या परिश्रमाने मोबाइल ट्रॅकिंग व स्थानिक खबऱ्याच्या माहितीनुसार जाळे रचले व अपहरणकर्त्यांच्या तावडीतून फिल्मी स्टाइल छापा टाकत नगरहून दोन मुख्य सूत्रधारांसह १३ जणांना गजाआड केले आहे. यातील १३वा आरोपी असिफ शेख, रा. मुंब्रा याला पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, हवालदार अभिमन्यू अहेर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. सुरुवातीचे बारा आरोपी सलमान शकील आदमाने (२६), रा. श्रीरामपूर, गणेश नारायण रसाळ (३३), रा. येवला यांच्यासह किरण सुनील कडू (२१), रा. शिर्डी, समीर रशीद बेग (२६), रा. राहता, राकेश वाल्मीक महानोर (२२), रा. राहता, नदी अन्सार पठाण (२५), रा. श्रीरामपूर, मंगेश बबनराव पवार (२८), रा श्रीरामपूर, गणेश नारायण शिरसाठ (३४), रा. अहमदनगर, स्वप्निल सुभेंद्र साळवी, (२३), रा. अहमदनगर, पूजा पंकज जैन (२५), रा. श्रीरामपूर, रचना सुभेंद्र साळवी (४०), रा. अहमदनगर, रविना सुभेंद्र साळवी (२१), रा. अहमदनगर यांना येवला न्यायालयाने बुधवारी अधिक तपासासाठी पोलीस कोठडी दिली होती. गुरुवारी असिफ शेख या आरोपीला येवला न्यायालयात हजर केले असता यालादेखील पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला सलमान आदमने आणि किरण कडू हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी या गुन्ह्यातील गणेश रसाळ हा या कटातील मुख्य आरोपी
ठरला. त्यामुळे अनेकांना धक्का बसला.
मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींनी पोलिसाची दिशाभूल केली. मात्र पोलीस यंत्रणेने जुन्याच म्हणजेच खबरी नेटवर्कचा वापर करून सूत्रबद्ध नियोजनामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. मुख्य सूत्रधाराने रचलेल्या कटानुसार अपह्रत दोन तरुणापैकी शाहबाज शेखला जीवे मारून राहुल चव्हाणलाच या गुन्ह्यात अडकवण्याचा मनसुबा पोलीस तपासात उघड झाल्याची चर्चा येवला शहरात सुरू होती. या प्रकरणातील युवतीकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त आणखी काही हनी ट्रॅप झाले आहे का, याचीदेखील माहिती मिळण्याची शक्यता पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी वर्तवली. या यशस्वी मोहिमेमुळे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)