पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण'

By महेश गलांडे | Published: December 27, 2020 03:48 PM2020-12-27T15:48:35+5:302020-12-27T16:40:25+5:30

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे.

Parth Pawar's candidature from Pandharpur, Rohit Pawar says 'politics' about MLA | पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण'

पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण'

googlenewsNext
ठळक मुद्देपार्थ पवार यांच्या पंढरपुरातील उमेदवारीसंदर्भात रोहित पवार यांना विचारले असता, कुणी मागणी केली म्हणून लगेच पूर्ण होईल, असे नाही, असं म्हटलंय.

नाशिक/ मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळू शकते. तशी मागणी माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली आहे. त्यानंतर, राजकीय वर्तुळात पार्थ पवार यांच्या आमदारकीवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी मीडियाशी बोलताना आपलं मत व्यक्त केलंय.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आल्यास रखडलेली विकासकामं लवकर होतील. त्यामुळे पार्थ यांना संधी दिली जावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली आहे. भालके यांच्या निधनानंतर शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं. मात्र भालकेंच्या जागी कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल भाष्य करणं त्यांनी टाळलं. त्यामुळे पंढरपूरमध्ये कोणाला संधी मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.

पार्थ पवार यांच्या पंढरपुरातील उमेदवारीसंदर्भात रोहित पवार यांना विचारले असता, कुणी मागणी केली म्हणून लगेच पूर्ण होईल, असे नाही, असं म्हटलंय. तसेच, पवारसाहेब, अजित दादा, तिथले पालकमंत्री यासंदर्भातील निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेतात. तिथे असलेल्या लोकांना योग्य तो न्याय दिला जाईल असा मला विश्वास आहे, असं रोहित पवार म्हणाले. परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कुणी अशी मागणी केली म्हणून लगेच ती पूर्ण होईल असं होत नाही, असंही रोहित यांनी सांगितलं.

भगिरथ भालकेंच्या नावाचीही चर्चा

पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्यास विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक विरोधात जाणार नाहीत. त्यामुळे पार्थ यांच्यासाठी निवडणूक सोपी असेल, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. पार्थ यांना पोटनिवडणुकीत संधी दिली जावी आणि त्यानंतर पुढे होणाऱ्या निवडणुकीत दिवंगत भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा विचार व्हावा, असं या गटाला वाटतं. भारत भालकेंच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, २०१९ मध्ये पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता.
 

Web Title: Parth Pawar's candidature from Pandharpur, Rohit Pawar says 'politics' about MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.