ओव्हरफ्लो जलकुंभातून लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 18:47 IST2019-06-05T18:46:39+5:302019-06-05T18:47:03+5:30
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील ...

ओव्हरफ्लो जलकुंभातून लाखो लिटर पाणी वाया
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील पाणी साठाही कमालिचा घटला आहे, अशा परिस्थितीत महापालिका पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे त्याच महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध जलकुंभ ओव्हरफ्लो होवून त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील वासन नगर येथील पोलिस वसाहती समोरील जलकुंभातून बुधवारी दुपारी लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छा नगर परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसापूर्वी जलकुंभातून पाणी सोडणाºया महापालिकेच्या व्हाल्वमनला परिसरातील संतप्त महिलांनी घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेवून पाणी पुरवठा सुरूळीत करण्याचे काम केले. तरी देखील पुरेशा दाबाने व वेळेत पाणी मिळत नसल्याने प्रभाग क्रमांक ३० मधील पाटील गार्डन ते अरुणोदय सोसायटी सह परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बुधवारी दुपारी पावणे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान पोलिस वसाहती समोरील जलकुंभ ओव्हरफ्लो झाला व सदरची बाब व्हॉल्वमनच्या लक्षात न आल्याने लाखो लिटर पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे अवघ्या काही वेळातच जलकुंभ परिसरात जागोजागी पाण्याचे तलाव साचले, भर उकाड्यात शुद्ध पाण्याचा झरा वाहत असल्याचे पाहून परिसरातील बालगोपालांनी या पाण्यात उड्या मारण्याचा आनंद द्विगुणीत केला. शहर पाणी टंचाईने होरपळत असताना वाया जाणारे पाणी पाहून नागरिकांनी तातडीने नगरसेवक पुष्पा आव्हाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून जलकुंभातून वाया जाणारे पाणी थांबविण्यात यश मिळाले.
पंधरा दिवसांपुर्वी सिडकोतील खुटवडनगर येथील जलकुंभातूनही अशाच प्रकारे लाखो लिटर पाणी जलकुंभ ओव्हरफ्लो होवून वाया गेले होते. त्यावेळीही महापालिकेच्या कारभारावर टिका करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्यापासून बोध न घेता, महापालिकेचा गलथानपणा कायम राहिला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरणात अल्पसाठा असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे महापालिकाच आपल्या हक्काच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यास अपयशी ठरत असल्याच्या घटना चिंता वाढविणाºया आहे.