नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबतचा प्रश्न आतापर्यंत मार्गी लागू शकलेला नाही. त्यातच आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी 'जळगावात' केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावर स्पष्टीकरण दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे १७ ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर होते. जळगाव विमानतळावर छगन भुजबळ यांनी तर जिल्हा नियोजन सभागृहात अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केले.
छगन भुजबळांची पालकमंत्रिपदाबद्दल भूमिका काय?
छगन भुजबळ यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रायगडमध्ये आमची एकच जागा आहे. पण त्यासाठी आम्ही पालकमंत्रिपदाचा आग्रह धरतो. त्याप्रमाणे नाशिकमध्ये आमच्या पक्षाचे सर्वाधिक ७ आमदार आहेत. त्यासाठी आमच्या आमदारांनीही पालकमंत्रिपदासाठी तितकाच आग्रह धरावा. पालकमंत्री कोण होणार हा प्रश्न नाही. पण जर एकाच पक्षाचे सात आमदार असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्रिपद मिळायला पाहिजे, याबद्दल मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी बोलेन, असे छगन भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले गिरीश महाजन?
लोक मला पालकमंत्री बोलत होते. मी त्यांना बोललो पालकमंत्री अजून होणार आहे. पालकमंत्री म्हणून मी माझे बोर्डही लावलेले नाही. तसेच ज्यांनी हे बोर्ड लावले होते त्यांना काढायला लावले. झेंडावंदनाचा तात्पुरता मला अधिकार दिला आहे. झेंडावंदन केले म्हणून पालकमंत्री झालो असे नाही. कुंभमेळा मंत्री मी आहे. बैठका घेतोय मात्र पालकमंत्री पदावरून आपसात काही अडचणी आहेत त्या सुटतील, मी कोणताही दावा करणार नाही आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
निर्णयाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा : अजित पवार
कोणाला कोणते मंत्रीपदा द्यायचे, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या मंत्र्याला पालकमंत्रीपद द्यायचे याबाबतचा सर्व निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात, नाशिकचे पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे याबाबतचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेतील, आणि हा निर्णय घेण्यासाठी ते सक्षम असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
नाशिकला पालकमंत्री नसताना, झेंडावंदन होतेय, जिल्हा नियोजन समितीची बैठक होतेय, कोणत्याही विकासकामावर पालकमंत्री नसल्याने परिणाम झालेला नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.