कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:29 IST2025-07-23T16:24:13+5:302025-07-23T16:29:07+5:30
Nashik Onion News: आगामी काळात कांद्याचे दर आणखी कमी होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्याला आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील बदलती समीकरणे जबाबदार ठरणार आहे.

कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
Nashik Onion Market Marathi News: बाजारातील मागणीतील घट, साठवणुकीची मर्यादा आणि प्रक्रियेचा अभाव, 'नाफेड' अन् 'एनसीसीएफ'ला कांदा खरेदीत मिळालेला थंड प्रतिसाद, कांदा निर्यातीत बांगलादेशचे आडमुठे धोरण या कारणांमुळे कांदा भावात कमालीची घसरण झाली असताना आता लवकरच दक्षिणेसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तसेच 'एनसीसीएफ' व 'नाफेड'चा कांदा एकाच वेळी बाजारात येणार असल्याने बफर स्टॉक उपलब्ध होईल. यामुळे कांद्याच्या भावात अजून घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे कांद्यावरील प्रोत्साहन राशी वाढविण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सध्या दक्षिणेतील कांद्याने स्थानिक बाजारात मुंगीच्या पावलांनी एन्ट्री केली असून, हा कांदा तेथील संपूर्ण बाजारपेठ काबीज करेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला तिकडे मागणी राहणार नाही. परिणामी, आपल्याकडील कांद्याचे भाव अजून गडगडू शकतात.
दुसरीकडे नाफेडची कांदा खरेदी बंद होणार असल्याची चर्चा कांदा बाजारात सुरू असून, नाफेडच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. नाफेडचे राज्यातील २२ कांदा खरेदी केंद्र अजून सुरू असल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक आर. एम. पटनायक यांनी दिली. कांद्याला सरासरी फक्त १३०० ते १४०० चा भाव मिळत आहे. हा भाव अजून कमी झाला तर संकट वाढेल.
कांद्याची साठवणूक; पण पुढे भावाचे काय?
अनेक शेतकरी भाववाढ होईल या आशेवर असून, ते कांदाचाळीत कांदा साठवून ठेवत आहेत. त्यामुळे इकडे नाफेड, 'एनसीसीएफ'च्या कांदा खरेदी केंद्रांवर शुकशुकाट आहे; पण दक्षिणेसह महाराष्ट्रातील या ४४ केंद्रांवरील तीन लाख टन कांदा एकाच वेळी बाजारात आला तर भाव अजून गडगडू शकतात.
...तरच पाकिस्तान, चीनच्या कांद्याला टक्कर
तज्ज्ञांच्या मते विशेषतः जेव्हा देशांतर्गत पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता असते. तेव्हा आपण पाकिस्तान आणि चीनसारख्या इतर प्रमुख कांदा निर्यातदार देशांकडून होणाऱ्या तीव्र स्पर्धेचादेखील विचार केला पाहिजे. या दोन्ही देशांत यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा पीक आहे.
त्यात हे देश आधीच खूप कमी दराने कांद्याचा पुरवठा करीत असल्याने, भारतीय निर्यातदारांना सरकारचा मजबूत पाठिंबा प्रोत्साहन राशी ५ टक्के केला तर मिळेल, त्यामुळे आपण चीन व पाकिस्तानच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात टक्कर देऊ शकू.
तज्ज्ञ काय म्हणतात?
कांदा उत्पादन व निर्यात १ क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली असता, पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये बाजारात कांद्याचा बफर स्टॉक आल्यावर कांद्यावरील प्रोत्साहन राशी कमी करणे हाच एकमेव उपाय कांद्याच्या भाववाढीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
विकाससिंग यांनी सांगितले की, निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष या कारणांमुळे याचा व्यापाऱ्यांवरही गंभीर परिणाम होईल, ज्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होईल. कांद्यावरील निर्यात प्रोत्साहन राशी १.९ टक्के आहे. ती ५ टक्के करावी. त्याचा अधिक लाभ शेतकऱ्यांनाच होईल. या मागणीसाठी आम्ही केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना निवेदन दिले आहे.
बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा उत्पादक देश असून यावर्षी बांगलादेशात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. त्यामुळे येथील कांदा स्थानिक बाजारपेठेत टिकला. परिणामी भारतातील कांद्याची गरज बांगलादेशला सध्या नाही. मात्र तेथील कांदा अंतिम टप्प्यात असून ऑगस्टमध्ये भारतातील कांद्याची त्यांना गरज भासेल.