एक लाख ७३ हजारांची चांदवडला चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:16 IST2018-02-27T00:16:47+5:302018-02-27T00:16:47+5:30
शहरातील डावखरनगर येथील बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश करत एकास मारहाण करून एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

एक लाख ७३ हजारांची चांदवडला चोरी
चांदवड : शहरातील डावखरनगर येथील बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश करत एकास मारहाण करून एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. डावखरनगरात सुयश यशवंत गवारे यांचा सुयश निवास नावाचा बंगला आहे. सोमवारी (दि. २५) पहाटे ३. ४५ वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. झोपलेले सुयश गवारे यांना बांबूने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी ४० हजारांची सोन्याची साखळी, अंगठी, ४० हजारांचे मंगळसूत्र व ८५ हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गवारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथक, ठिसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस तपास करीत आहेत.
असे आहे वर्णन
चार अनोळखी चोर २५ ते ३० वयोगटातील होते. ते हिंदी व मराठी बोलणारे होते. त्यातील दोघांनी फूलपॅण्ट, तर अन्य दोघांनी बर्मुडा व टी-शर्ट घातलेले होते. सर्वजण मध्यम बांध्याचे होते. त्यातील दोघे उंच होते, तर दोन मध्यम उंचीचे होते, असे वर्णन गवारे यांनी केले आहे.