Chhagan Bhujbal ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलल्याने नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. या अनुषंगाने विविध संघटनांच्या बैठका घेत भुजबळ यांच्याकडून मोर्चेबांधणीही सुरू आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयामुळे ओबीसी वर्गात अस्वस्थता असल्याचा दावा भुजबळांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना छगन भुजबळ यांच्यावर पलटवार करत भुजबळ यांना ओबीसी म्हणून फक्त स्वत:चे कुटुंबच दिसते, असा हल्लाबोल केला आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, "छगन भुजबळ यांना ओबीसी म्हणून फक्त ते स्वत:, त्यांचा मुलगा आणि पुतण्या एवढंच दिसत असेल. बाकी ओबीसी फॅक्टर म्हणजे त्यांना दुसरा ओबीसी दिसत नाही. भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही. कारण चूक असेल तर समजूत काढली गेली असती. पण हा निर्णय घेताना कोणतीही चूक झालेली नाही. छगन भुजबळांना आमच्या पक्षाने जो न्याय दिलाय, तो अन्य कोणत्याही पक्षाने दिलेला नाही," अशा शब्दांत कोकाटे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले की, "मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत अनेक गोष्टींची चर्चा झाली. काय काय घडले, काय काय सुरू आहे, यावर चर्चा केली. वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच आपल्याला मान्यच केले पाहिजे की, महायुतीला महाविजय मिळाला, त्यात ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणात होते. ओबीसी समाजाचा या विजयात मोठा वाटा आहे. इतर घटकांचाही वाटा आहेच. परंतु, विशेष करून ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला, त्याबाबत आपण सर्वांचे आभार मानले पाहिजेत, असेही फडणवीसांनी म्हटले आहे. हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थिती ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाहीत," असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
भुजबळांचा भाजप प्रवेश? मुख्यमंत्री म्हणाले...
छगन भुजबळांसोबत झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "आमच्या भेटीत काय चर्चा झाली, याबद्दल भुजबळांनी तुम्हाला (माध्यमांना) माहिती दिली आहे. नव्याने माहिती देण्याची आवश्यकता नाही. पण भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष त्यांचा सन्मान करतात. महायुतीच्या विजयात त्यांचादेखील वाटा राहिला आहे. ते राष्ट्रवादीत असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचा प्रश्न नाही, त्यांनीही तशी इच्छा बोलून दाखवलेली नाही", असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.