नोटिसांचे सोपस्कार पूर्ण : जुने नाशिक-पंचवटीमध्ये २८५ धोकादायक वाडे अन् घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:49 IST2018-08-06T15:38:03+5:302018-08-06T15:49:24+5:30
दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात.

नोटिसांचे सोपस्कार पूर्ण : जुने नाशिक-पंचवटीमध्ये २८५ धोकादायक वाडे अन् घरे
नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा विभागांमधील गावठाणचा सर्व्हे करुन ३९७ धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेकडून दरवर्षी शहरातील जुने नाशिक, पंचवटी या गावठाण भागासह अन्यत्र असलेल्या धोकादायक वाडे-घरांना नोटिसा बजावण्याची औपचारिकता पार पाडली जाते, ती यावर्षीही पार पाडली गेली. या नोटिसांच्या माध्यमातून संबंधितांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यातच जुने नाशिक, पंचवटी परिसरात बऱ्याच जुन्या वाड्यांमध्ये भाडेकरू-मालक वाद असल्याने या नोटिसांबाबत फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. बहुतांश वाड्यांचा वाद थेट न्यायप्रविष्ट आहे. जुने नाशिक आणि पंचवटी भागातील एकूण २८५ धोकादायक वाडे, घरे महापालिकेने धोक्याचे ठरविले आहे. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात. यावर्षीही काही घटना घडल्या आहेत. रविवारी घडलेली घटना ही अद्याप सर्वात मोठी व गंभीर घटना ठरली.
नागरिक, प्रशासनाचे हवे संयुक्त प्रयत्न
रविवारच्या दुर्दैवी घटनेच्या रुपाने संबंधितांवर काळाची झडप? किंवा सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष? या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली असली तरी दोघा जीवांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले हे निश्चित. अशा घटनांची पुनरावृत्ती भविष्यात टाळण्यासाठी जुनेनाशिककरांनाच पुढे येऊन तोडगा काढावा लागणार आहे. प्रशासनासह ज्या लोकप्रतिनिधी घटनास्थळी उघड्या डोळ्यांने विदारक चित्र बघत होते त्यांना शासनदरबारी वाढीव चटईक्षेत्रासाठी पाठपुरावा करुन प्रश्न तडीस न्यावा लागणार आहे.
मुंढे यांच्या भुमिकेकडे लक्ष
पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.
वाद थांबवा; सुरक्षा भक्कम करा
जुन्या नाशकातील पडक्या वाड्यांची अवस्था बिकट आहे, हे सर्वश्रुत आहे. जुने नाशिककरदेखील हे जाणून आहे. महापालिका प्रशासनही याबाबत अनभिज्ञ नाही; मात्र वाडामालक-भाडेकरु हा वाद समस्याचे निराकरण करण्यामधील मोठा अडसर ठरत आला आहे. हा वाद आपआपसांत सांमजस्याने मिटवून संबंधितांनी आपली आणि परिसराची सुरक्षा भक्कम करण्याचा प्रयत्न करायला हवा. पडीक वाडे जेथे कोणीही राहत नाही, ते संबंधित मालकांनी तातडीने महापालिके कडे पत्र देऊन उतरवून घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन आजुबाजूच्या रहिवाशांचा जीव धोक्यात येणार नाही. गावठाणासाठी लवकरच ‘क्लस्टर योजना’ राबविण्याचे विचाराधीन आहे. परंतु या प्रकारात वाड्यांची सुधारणा करण्यास कोणीही तयार नसल्याने आजूबाजूच्या रहिवाशांवर टांगती तलवार कायम आहे.