वाडा पाडकाम प्रकरणी विकासकाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:13+5:302021-07-07T04:17:13+5:30

नाशिक शहरातील गावठाण भागातील जुन्या वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्या वाड्यांचा क्लस्टर पद्धतीने विकास करण्यासाठी २०१७ मध्ये शहर ...

Notice to developer in Wada Padkam case | वाडा पाडकाम प्रकरणी विकासकाला नोटीस

वाडा पाडकाम प्रकरणी विकासकाला नोटीस

नाशिक शहरातील गावठाण भागातील जुन्या वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्या वाड्यांचा क्लस्टर पद्धतीने विकास करण्यासाठी २०१७ मध्ये शहर विकास आराखड्यात तरतूद करण्यात आली. मात्र, चार वर्षे झाले तरी गावठाण क्लस्टरचे भिजत घोंगडे आहे. त्यामुळे दरवर्षी पडक्या वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. महापालिका संबंधिताना नोटीस देण्यापलीकडे काहीच करू शकत नसल्याने अडचण निर्माण होते यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर १२१० वाड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यातील १५१ वाडे अतिधोकादायक आहेत. मात्र, शनिवारी घनकर लेनमधील ज्या वाड्याची भिंत कोसळली. तो वाडा मुळातच धोकादायक वाड्यांच्या यादीत नाही. या वाड्यालगत जोशी वाडा असून, त्याच्या पुनर्विकासासाठी बांधकाम करण्यात येत आहे. या वाड्याचे खोदकाम करण्यासाठी जेसीबीचा वापरदेखील करण्यात आला असून, त्यामुळे वैश्य वाड्याला हादरे बसले आणि त्याचीच भिंत कोसळली. यात दोन महिला या भिंतीबरोबरच पायासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या आहे. याच वाड्यातील अभिषेक वैश्य आणि त्यांचा मुलगा आर्य यांना अग्निशमन दलाने सुरक्षितरीत्या वाड्यातून बाहेर काढले, अशी प्राथमिक माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, गावठाणात वाड्यांचे बांधकाम करताना अनेक वाड्यांच्या भिंती सामाईक असल्याने दुसऱ्या वाडे मालकाने दुसऱ्या वाड्यांना हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. मात्र, वैश्य वाड्याजवळ अशी दक्षता घेतली गेली नसल्याचे सकृत दर्शनी आढळल्याने पुनर्विकासाचे काम करणाऱ्या विकासक आणि वास्तुविशारदाला नोटीस बजावल्याची माहिती नगररचना विभागाचे उपअभियंता सचिन जाधव यांनी दिली. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या तिन्ही वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

इन्फो...

बांधकामाला परवानी होती; पण..

घनकर गल्लीत सुरू असलेल्या वाड्याच्या पुनर्विकासाला महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी असून, तळघरापासून बांधकाम करण्यासाठी नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारची परवानगी देताना लगतच्या बांधकामांना धक्का लागणार नाही, अशी अटदेखील घातली जाते. प्रस्तुत प्रकरणात त्याचे पालन झाले नसल्याचे नगररचना विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इन्फो...

गावठाणांसाठी स्वतंत्र क्लस्टर मंजुरीसाठी राज्य शासनाकडे प्रलंबित असले तरी आता नवीन युनिफाइड डीसीपीआरमध्ये गाभा क्षेत्रात पुनर्विकास करण्यासाठी आकर्षक एफएसआय दिला जातो. त्यामुळे क्लस्टरसाठी कंटाळलेले अनेक वाडामालक आता स्वत:च पुनर्विकासासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत.

Web Title: Notice to developer in Wada Padkam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.