नाशिक : आगामी कुंभमेळ्यासाठी प्रशासनासोबत सक्रिय भूमिका बजाविण्यासह मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा पुरविणे, देवस्थानांच्या विकासकामांतील अडथळे, समस्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याचे विविध ठराव मंदिर विश्वस्तांच्या पहिल्याच बैठकीत संमत करण्यात आले.
शहर व जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांच्या विश्वस्तांच्या प्रतिनिधींची एकत्रित परिषद स्थापन करण्यात आली असून, येत्या कुंभमेळ्यात श्री कालिका माता मंदिर ट्रस्टच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी कालिका ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव पाटील, सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर, कपालेश्वर संस्थानचे अध्यक्ष अॅड. अक्षय कलंत्री, चांदीचा गणपती अध्यक्ष नरेंद्र पवार, नवश्या गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, अॅड. भाऊसाहेब गंभिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील देवस्थान विश्वस्तांचा नियोजनातील सहभाग निश्चित करणे. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाच्या संयुक्त नियोजनात सहभागी होणे. धर्मादाय आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांची संयुक्त बैठक आयोजित करून नाशिकमधील देवस्थानांच्या अडीअडचणी व विकासकामांसाठी आवश्यक त्या उपाय योजना करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करण्यावर चर्चा झाली.
संमत झालेले ठरावनाशिक देवस्थान विश्वस्त समिती-परिषदेची स्थापना करून त्या माध्यमातून देवस्थानांच्या समस्यांचे निराकरण व पाठपुरावा करणे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांच्या भेटीचे आयोजन, सर्व देवस्थानांच्या विश्वस्तांनी संयुक्त बैठक, विश्वस्तांना आपल्या समस्या मांडण्याकामी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे, परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे पाठपुरावा करणे.