नाशिकमध्ये दोन सराईत गुन्हेगारांकडून चार लाखांचे मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 18:26 IST2018-01-29T18:20:43+5:302018-01-29T18:26:57+5:30

नाशिकमध्ये दोन सराईत गुन्हेगारांकडून चार लाखांचे मोबाईल जप्त
नाशिक : शहरातील आठवडे बाजारासह गंगाघाटावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल चोरणा-या पंचवटीतील दोघा सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली आहे़ या दोघांच्या सखोल चौकशीतून त्यांनी चोरी केलेले चार लाख रुपये किमतीचे ३५ महागडे मोबाईलही जप्त करण्यात आले असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे़ दरम्यान, या तिस-या साथीदाराच्या अटकेनंतर आणखीण मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
गंगाघाटावरील भाजीबाजारात भाजीपाला खरेदी केल्यानंतर घराकडे मोबाईलवरून बोलत जाणा-या इसमाच्या डोक्यात फटका मारून मोबाईल लूट करणा-या तिघा संशयितांची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे व पोलीस शिपाई स्वप्निल जुंदे्र यांना मिळाली होती़ त्यानुसार संशयित राहूल भिकन कासार (१९, रा.मायको दवाखाना परिसर, पंचवटी) व विकी उर्फ टेम-या विजय भुजबळ (१९, रा.मोरेमळा,हनुमानवाडी, पंचवटी ) हे दोघे ठक्कर बाजार परिसरात मोबाईल विकण्यासाठी आले असता त्यांना सापळा लावून अटक केली़ तर त्यांचा तिसरा साथीदार सोनल उर्फ चिवड्या दशरथ बागड हा फरार झाला़
पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर गोदाघाटावरील भाजीबाजारात तब्बल ३५ महागडे मोबाईल चोरल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५ ईव्ही ८५८२) व मोबाईल असा सुमारे ४ लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, तिस-या साथीदाराच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून कासार व भुजबळ यांना जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे़
या दोघा सराईत गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या मोबाईलचे आयएमईआय नंबरची यादी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात लावण्यात आली आहे़ ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा़
- आनंदा वाघ, पोलीस निरीक्षक, शहर गुन्हे शाखा, युनिट एक़