मिनी ट्रॅक्टरचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:48 IST2018-01-08T20:43:56+5:302018-01-08T20:48:16+5:30
अनुसूचित जाती आणि नवबौद्धांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदानात पारदर्शकता यावी तसेच लाभार्थ्यांना थेट लाभ व्हावा यासाठी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे.

मिनी ट्रॅक्टरचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात
समाजकल्याण : अनुसूचित जाती संवर्गासाठीची योजना
नाशिक : अनुसूचित जाती आणि नवबौद्धांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदानात पारदर्शकता यावी तसेच लाभार्थ्यांना थेट लाभ व्हावा यासाठी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने (रोटेव्हेंटर व ट्रेलर) यांच्या खरेदीसाठी शासन ३ लाख १५ हजार रुपये कमाल अनुदान देणार आहे. सदर अनुदान लाभार्थ्याच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भातील अधिक माहिती सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडर सामाजिक न्याय भवन, नासर्डीपुलाजवळ येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ट्रॅक्टर व साधनांची किंमत साडेतीन लाखांपेक्षा अधिक असू नये त्यामध्ये शासन अनुदान हिस्सा ९० टक्के व बचत गटांचा हिस्सा १० टक्के इतका म्हणजे ३५ हजार रुपये आहे. ज्यांनी लाभासाठी अर्ज केलेले आहेत त्यातील ८० टक्के सभासद हे अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकांतील असले पाहिजे, असा निकष असून संबंधित बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजघटकातील असणे बंधनकारक आहे.
या योजनेंतर्गत बचत गटांची निवड झाल्यानंतर केंद्राच्या मिनिस्ट्री आॅफ अॅग्रिकल्चर अॅन्ड फार्मर्स डिपार्टमेंट यांनी निर्धारित केलेल्या मानकानुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करावी लागणार आहेत. खरेदी पावती सादर केल्यानंतर खातरजमा करूनच अनुदानाचा ५० टक्के हप्ता बचत गटांच्या संलग्न खात्यावर जमा करण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या आरटीओ कार्यालयाकडील नोंदी केल्यानंतरच उर्वरित अनुदान जप्त होणार असल्याचे समाजकल्याणच्या उपायुक्तांनी कळविले आहे.