आता नाशिक जिल्हा परिषदेत ‘शिस्त परेड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:54 IST2018-02-22T21:50:08+5:302018-02-22T21:54:26+5:30
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या धडक कारवाईचा कित्ता आता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही गिरविला असून, उशिरा कामावर येणाऱ्या ३७ कर्मचाऱ्याना त्यांनी नोटिसा बजविल्या आहेत.

आता नाशिक जिल्हा परिषदेत ‘शिस्त परेड’
नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या धडक कारवाईचा कित्ता आता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही गिरविला असून, उशिरा कामावर येणाऱ्या ३७ कर्मचाऱ्याना त्यांनी नोटिसा बजविल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विभागनिहाय अधिकाऱ्याच्या मॅरेथॉन बैठकांनंतर त्यांनी जिल्हा परिषदेची स्वच्छता आणि शिस्तीकडे लक्ष केंद्रित केले असून, गुरुवारी सकाळी त्यांनी ३७ कर्मचाऱ्याना नोटिसा काढल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते हे दि. २० रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेत दाखल झाले आणि आल्या आल्या त्यांनी खाते प्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. रात्री ९ वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी अधिकाऱ्याची बैठक बोलावून कामकाजाविषयी अधिक माहिती जाणून घेतली, तर त्यांना कामकाजाच्या सूचनाही केल्या होत्या. विशेषत: ३० टक्के निधीची तरतूद करण्याबरोबरच कोणत्याही परिस्थितीत शासनाकडे निधी परत जाणार नाही, असे नियोजन करून तत्काळ मंजुरी, प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रिया करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना केल्या होत्या. गतिमान प्रशासनासाठी त्यांनी अधिकाऱ्याशी संवादही साधला आहे.
दोन दिवस अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर गिते यांनी गुरुवारी सकाळीच जिल्हा परिषद गाठली आणि सर्वच विभागांची पाहणी केली असता उशिरा कामावर आलेल्या सुमारे ३७ कर्मचाऱ्याना नोटीस बजाविली. यावेळी गिते यांनी परिसरातील स्वच्छतेची बारकाईने चौकशी करून स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्याच्या सूचना करून संबंधित ठेकेदाराला समज देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. परिसरातील स्वच्छेतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून जिल्हा परिषेदेचे आवार तसेच इमारतीमधील साफसफाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गिते यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषषदेत गुरुवारी स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात आल्याचे चित्र होते. स्वच्छतागृहाची अनेकदा स्वच्छता करण्यात आली, तर आवारातील केरकचरा काढण्यात आला. इमारत आवारातील कक्षांचीही स्वच्छता करण्यात आली.