नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:41 IST2025-04-28T16:40:02+5:302025-04-28T16:41:42+5:30

म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील चामर लेणी डोंगरावर अशाच प्रकारे सकाळी ट्रेकिंगसाठी गेलेले दोन महाविद्यालयीन विद्यार्थी अडकून पडले होते. 

Nashik: Went trekking with son and got stuck on the mountain of Pandava Cave; later... | नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...

नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...

नाशिक शहरातील प्रसिद्ध अशा पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या त्रिरश्मी लेणीच्या (पांडवलेणी) डोंगरावर अॅड. उमेश वालझाडे हे त्यांच्या मुलासोबत रविवारी (दि.२७) ट्रेकिंगसाठी गेले होते. डोंगराच्या दक्षिण बाजूला हे पिता-पुत्र खाली उतरताना अडकून पडले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रविवारच्या (२७ एप्रिल) सुट्टीचे औचित्य साधत पर्यटकांसह हौशी गिर्यारोहक शहराजवळच्या त्रिरश्मी लेणी, चामर लेणीवर ट्रेकिंगकरिता जातात. वालझाडे पिता-पुत्रानेही रविवारी सकाळी लेणी चढण्यास सुरुवात केली. 

लेणीवर पोहोचले अन्...

लेणीवर पोहोचल्यानंतर त्यांनी डोंगर सर करण्याच्या उद्देशाने चढाई सुरू केली. डोंगर चढून माथ्यावर पोहोचल्यानंतर मात्र उतरताना निश्चित वाट सापडत नसल्याने त्यांच्या मनात भीती दाटली. नेहरू वनोद्यानाच्या बाजूने डोंगरावरून उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पोलीस नियंत्रण कक्षाला केला कॉल

मात्र, रस्ता गवतात हरवलेला असल्याने धाडस टाळले. मदतीसाठी त्यांनी मनपाच्या आपत्ती निवारण कक्ष व पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क साधला. 'कॉल' मिळताच इंदिरानगर पोलिस, सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान, नाशिक रेस्क्युअर्स क्लायम्बर्स असोसिएशन (एनआरसीए) पथकाने घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. अतिरिक्त कुमक म्हणून वैनतेय गिर्यारोहण संस्थेचे पथकदेखील साधनसामग्रीसह सज्ज झाले होते.

सुमारे दोन तासांच्या बचावकार्य गिर्यारोहकांच्या चमूने पार पाडले. दुपारी साडेबाराच्या सुमारास वालझाडे पिता पुत्राला खाली उतरविण्यास यश आले.

आठवडाभरापूर्वीही घडली होती घटना

म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील चामर लेणी डोंगरावर अशाच प्रकारे सकाळी ट्रेकिंगसाठी गेलेले दोन महाविद्यालयीन विद्यार्थी अडकून पडले होते. 

अग्निशमन दल पंचवटी व वैनतेय गिर्यारोहक संस्थेने त्यांची सुरक्षितरीत्या सुटका केली होती. हौशी ट्रेकर्सने गड, डोंगर चढाई करणे टाळायला हवे, असे मत वैनतेय गिर्यारोहक संस्थेचे प्रशांत परदेशी यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Nashik: Went trekking with son and got stuck on the mountain of Pandava Cave; later...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.