Nashik Crime News: नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेले दोघे सराईत गुंड पैसे मागण्याच्या कारणावरून भिडले. जेलरोड, बालाजीनगर येथे गुरुवारी (१ मे) हितेश डोईफोडे रात्री टॉमीने केलेल्या हल्ल्यात हितेश सुभाष डोईफोडे हा जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र रोहित बंग हा जखमी झाला. अवैध दारूविक्रीच्या व्यवसातील पैसे वारंवार मागण्यावरून दोघांमध्ये वादाचा भडका उडाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मारेकरी नीलेश यानेच जखमी हितेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात सोडल्यानंतर नीलेशने गोदावरीवर जाऊन अंघोळ करत कपडे धुतले, त्यानंतर नवीन कपडे घालून पोलिस ठाण्यात हजर झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जाधव बंधूंच्या दुहेरी हत्याकांडानंतर नाशिकरोड परिसर या घटनेने पुन्हा हादरला. जेलरोड येथील सानेगुरुजीनगर झोपडपट्टीतील हितेश सुभाष डोईफोडे (२१) याला दि. २५ मे २०२४ रोजी दोन वर्षासाठी व नीलेश बाजीराव पेखले (३९ रा. बालाजीनगर) याला दि. १९ नोव्हेंबर २०२४ ला एक वर्षासाठी नाशिक शहर जिल्ह्यातून पोलिस प्रशासनाने हद्दपार केले आहे.
नीलेश पेखळे याचा बालाजीनगर परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा असून, हितेश व नीलेश हे एकमेकांचे मित्रदेखील होते. हितेश हा नीलेशकडे वारंवार पैशांची मागणीदेखील करत होता.
हितेश डोईफोडे हा तडीपार असताना गुरुवारी (दि.१) सायंकाळी ७वाजेच्या सुमारास बिटको पॉइंटजवळ त्याच्या घराशेजारी राहणारा रिक्षाचालक रोहित नंदकिशोर बंग याला भेटला. मुलीचा वाढदिवस जवळ आला असून, सर्व मित्रांना निमंत्रण द्यायचे आहे, असे सांगून हितेश रोहितला सोबत घेऊन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास देवळालीगाव राजवाडा येथील बहिणीच्या घरी गेला.
तेथे रोहितने रिक्षा लावली. त्यानंतर हितेशने तेथेच ओळखीच्या मित्राची लाल रंगाची दुचाकी घेऊन रोहितला सोबत घेत एकलहरा गाठले. मात्र हितेश हा जेलरोड दसक येथील महाराष्ट्र बँकेकडून पुन्हा वळून बालाजीनगर मोरे मळा येथे राहणारा नीलेश पेखले याच्या घरासमोर रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास येऊन थांबला. यावेळी नीलेश याच्यासोबत आणखीन दोनजण होते. हितेश व नीलेश यांच्यात बाचाबाची झाली.
जखमी असताना पळ; पण पुन्हा गाठले
नीलेश व त्याच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी रोहित बंग यालादेखील मारहाण करण्यास सुरुवात केली. जखमी हितेश हा सायखेडा रोडच्या दिशेने पळू लागताच नीलेश व त्याच्या मित्रांनी पुन्हा त्याचा पाठलाग करत लोखंडी रॉड, हत्यारांनी हल्ला चढवून निघृण खून केला.
दोघांमध्ये हमरीतुमरी होत नीलेश पेखळे याने लोखंडी टॉमीने हितेशच्या कपाळावर जोरदार प्रहार केल्याने एका दणक्यातच हितेश हा जमिनीवर कोसळला. कपाळाचा अर्धा भाग त्या फटक्यात उघडा होऊन त्या ठिकाणी सर्वत्र रक्त सांडले.
जखमी रोहित गवतात लपला म्हणून बचावला
जखमी रोहित बंग हा भैरवनाथनगरच्या दिशेने पळत जाऊन रेल्वेरुळाच्या बाजूला गवतामध्ये लपून बसला. यावेळी तेथून जाणाऱ्या एका इसमांकडून रोहितने मोबाइल घेऊन भाऊ राहुल यास घडलेला प्रकार सांगत, घ्यायला बोलाविले व बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रक्ताच्या थारोळ्यात...
घराजवळच नीलेश व हितेश यांच्यात बाचाबाची होऊन वादाचा भडका उडाल्यानंतर टॉमीच्या हल्ल्यामध्ये हितेश हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता.
निपचित पडलेल्या हितेशला नेले दवाखान्यात
हल्ला करणाऱ्या नीलेशने निपचित पडलेल्या हितेशला आपल्या चारचाकी गाडीतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोपर्यत घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नीलेश व हितेश यांच्यात वाद झाल्याची माहिती झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरविली. मात्र रुग्णालयात हितेशला सोडल्यानंतर नीलेश हा स्वतःहून नाशिकरोड पोलिस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी
संशयित नीलेश पेखळे याला शुक्रवारी (दि.२) दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता गुरुवारपर्यंत (८ मे) पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मयत हितेश व संशयित नीलेश हे दोघे विवाहित असून, त्यांना मुले आहेत.
रोहित बंग याच्या फिर्यादीवरून नीलेशसोबत आणखी कोण होते? याचा पोलिस शोध घेत आहे. सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे पुढील तपास करत आहे.