नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:00 IST2025-09-25T15:58:13+5:302025-09-25T16:00:27+5:30
Nashik Metropolitan Region Development Authority news: हा आराखडा हायटेक पद्धतीने करण्यात येणार असल्याने खासगी संस्थेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
Nashik Metropolitan Region Development Authority: नाशिक शहरालगतचा नाशिक तालुका, तसेच हद्दीलगतच्या एकूण सहा तालुक्यांचा विकास आराखडा नाशिक महानगर विकास प्राधिकरण तयार करणार असून, त्यासाठी अधिकृतरित्या इरादा जाहीर करण्यात आला आहे. अर्थातच हा आराखडा हायटेक पद्धतीने करण्यात येणार असल्याने खासगी संस्थेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाशिक महापालिका क्षेत्रातच्या भोवतालच्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्यशासनाने मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना १ मार्च २०१७ रोजी केली आहे.
नाशिक महानगर विकास प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर हा विकास आराखडा तातडीने करण्याची गरज होती. मात्र, आधी पूर्णवेळ महानगर आयुक्त नाही आणि नंतर आयुक्त उपलब्ध झाल्यानंतर त्यांची दोन वर्षात, तर एकाची तीन महिन्यांत बदली यामुळे सर्व प्रक्रियाच रखडली होती.
महानगर आयुक्तपदी माणिकराव गुरसळ यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या कामाला चालना दिली आहे. त्यानुसार आता आठ वर्षानंतर आराखडा तयार करण्यात येणार आहे.
इरादा जाहीर करण्यासाठी २२ सप्टेंबर २०२५ रोजी ठराव संमत केला. त्यानंतर शासनाच्या मान्यतेने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणारी अधिसूचना बुधवारी (२४ सप्टेंबर) जारी करण्यात आली आहे.
प्राधिकरणाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी बुधवारी (२४ सप्टेंबर) इरादा घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार संपूर्ण क्षेत्राचा नकाशा जाहीर करण्यात आला आहे. त्यात एखाद्या गावाचे नाव नसेल किंवा अन्य क्षेत्र दिसत नसेल, तर या क्षेत्रातील नागरिक हरकती किंवा सूचना करू शकतील. त्याचा आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.
१३ हजार हेक्टर शासकीय जागा
विकास आराखडा तयार करण्यापूर्वी शासकिय जमिनीचे मोजमाप करण्यात येत आहे. शासनाने यापूर्वीच शासकीय जागा एनएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाच्या एकूण २२३० चौरस किमी क्षेत्रात २७५ गावांचा समावेश आहे.
नाशिक तालुक्यांचा संपूर्ण भाग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत आहे. याशिवाय सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबक, निफाड या तालुक्यांचा समावेश आहे. नाशिक महापालिका हद्द वगळता हा आराखडा असणार आहे. प्राधिकरणाने या क्षेत्रात दोन नगररचना योजना (टीपी स्कीम) अगोदरच तयार केल्या आहेत.
"पूर्वी आराखड्याचे अॅटोकॅडमध्ये काम केले जात होते. त्यामुळे शासकीय नगररचना युनीट हे काम करीत होते. मात्र आता जीआयएस मॅपींग, ड्रोन सर्वे अशा साधनांचा वापर केला जात असल्याने खासगी एजन्सीमार्फत विकास आराखड्याचे काम करण्यात येणार येणार आहे. अस्तित्वातील जमिनीचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा महिने प्रथम दिली जातील आणि गरजेनुसार पुढे वाढ दिली जाईल", असे एनएमआरडीएच्या सहसंचालक जयश्रीराणी सुर्वे यांनी सांगितले.