नाशिक हादरले! होळीच्या दिवशीच तरुणाची सपासप वार करत हत्या, टोळक्याकडून चॉपरने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 00:22 IST2025-03-14T00:21:34+5:302025-03-14T00:22:27+5:30
Nashik News: या घटनेने पुन्हा एकदा अंबड पोलिस ठाणे हद्दीतील सिडकोमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले.

नाशिक हादरले! होळीच्या दिवशीच तरुणाची सपासप वार करत हत्या, टोळक्याकडून चॉपरने हल्ला
-नरेंद्र दंडगव्हाळ, नाशिक
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोच्या शुभम पार्क भागातील चर्चसमोरील मुख्य वर्दळीचा रस्त्यालगत गुरुवारी (१३ मार्च) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने सुमित देवरे (वय २८, रा.महाजननगर) याच्यावर हल्ला चढवून चॉपरने सपासप वार करत हत्या केली. ऐन होळीची सर्वत्र लगबग सुरू असताना अचानकपणे रात्री झालेल्या या खुनाच्या घटनेने नाशिक पुन्हा हादरले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिडको परिसरात जागोजागी होळी पेटवून महिलांकडून पुजाविधी केला जात असताना अचानकपणे केवल पार्क भागात रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही खुनाची घटना घडली.
या घटनेने पुन्हा एकदा अंबड पोलिस ठाणे हद्दीतील सिडकोमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्य या खुनाच्या घटनेने परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जुन्या भांडणातून हत्या
मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने देवरेचा काटा काढल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राकेश हांडे यांचे पथकासह गुन्हे शाखा युनिट-१चे पोलिस निरिक्षक मधुकर कड यांच्यासह व युनिट-२ चे पथक तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
तातडीने गंभीर जखमी सुमीतला पोलिस वाहनातून शासकिय जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.