नाशिक सातपूर येथील गोळीबार प्रकरण: मुख्य आरोपी भूषण लोंढेला नेपाळ सीमेवरून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:40 IST2025-12-03T20:40:21+5:302025-12-03T20:40:38+5:30
नाशिक क्राइम ब्रँच युनिट २ च्या पथकाची कारवाई

नाशिक सातपूर येथील गोळीबार प्रकरण: मुख्य आरोपी भूषण लोंढेला नेपाळ सीमेवरून अटक
नाशिक: सातपूर गोळीबार प्रकरणातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राइम ब्रँच युनिट २ च्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ बॉर्डरजवळ ही महत्त्वाची कारवाई केली आहे. नाशिकच्या गुन्हेगारी जगतातील चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत आरोपी अटक करण्यासाठी विविध पथक रवाना केली होती.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही संशयित आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी सतत ठिकाण बदलत होते. ते राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिक पोलिस पथक हे शोध घेत असताना पोलिसांना हुलकावणी देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बडौत येथे पोलिसांची त्यांना चाहूल लागताच, भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणाहून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मुख्य संशयित भूषण लोंढे याचे पाय फ्रॅक्चर झाले. तरी या संशयितांनी येथून पळ काढत नेपाळ बॉर्डर आश्रय घेतला होता. या घटनेनंतरही आरोपी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये फिरत होते. मात्र, नाशिक पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्हीचा योग्य वापर करत त्यांचा माग काढला. अखेर नेपाळ बॉर्डरजवळ असलेल्या महाराजगंज येथून या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.
सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गजाआड झाल्यामुळे नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोंढे टोळी ही सक्रीय होती. सातपूर निखिल गोळीबार प्रकरणाच्या टोळीचे नाव आल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा बीमोड करण्यासाठी त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील लोंढे टोळीतील मुख्य संशयित भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. अखेर नाशिक पोलिसांनी त्यांना नेपाळ भारत बॉर्डरजवळून अटक केली आहे. लवकरच त्यांना नाशिक येथे आणण्यात येणार असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.