nashik police gavthi daru seized in Phule Nagar | फुलेनगरमधील गावठी दारूची हातभट्टी जप्त
फुलेनगरमधील गावठी दारूची हातभट्टी जप्त

ठळक मुद्देपंचवटी पोलिसांची कामगिरी : ८०० लिटर रसायन नष्ट

नाशिक : फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणा-या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन तसेच हातभट्टीची तयार गावठी दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी संशयित रमेश नागनाथ जाधव या संशयिताविरुद्ध पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे.

फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राहणारा संशयित जाधव हा हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून खात्री केली असता एका बंद खोलीत संशयित जाधव हा गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सकाळी या हातभट्टीवर छापा टाकला असता गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन तसेच दोन ड्रममध्ये ३० लिटर तयार गावठी दारू त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी दारू तसेच सुमारे आठशे लिटर रसायन जागेवरच नष्ट करून पोलिसांनी मोठे पातेले, प्लॅस्टिक ड्रम, गॅस शेगडी, सिलिंडर असा मुद्देमाल जप्त केला आहे.

अन्य परिसरातही गावठीची विक्री
फुलेनगर परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. फुलेनगरप्रमाणेच पंचवटी परिसरातील अन्य काही भागातही खुलेआमपणे गावठी दारू बनविण्याचे अड्डे असून, पोलीस त्याकडे लक्ष वेधणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Web Title: nashik police gavthi daru seized in Phule Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.