दिनेश पाठक, नाशिक: अत्यंत संघर्षाच्या काळात जे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यासोबत इमाने इतबारे राहिले ते पक्षासाठी सर्वोच्च आहेत. त्या अनुषंगाने सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटनेची नवीन बांधणी केली जाईल. आमची तर समविचारी पक्षांसोबत आगामी निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मात्र, ते सोबत आले तर ठिक नाहीतर निवडणूक स्वबळावर लढू, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी येथे पक्षाच्या बैठकीत दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची जिल्हा व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक आमदार पवार, जिल्हा निरीक्षक सुनील भुसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.२४) झाली. येणाऱ्या काळात पक्ष संघटनेत होणाऱ्या बदलांबाबत कल्पना आढावा बैठकीत देण्यात आली. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे संकेत आमदार रोहित पवार यांनी बैठकीत दिले.
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक गांभीर्याने घेण्याचा सल्ला पवार यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची चर्चा करा व जर ते तयार असतील तर एकत्र निवडणुका लढवा आणि त्यांनी जर सहमती दर्शवली नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करा, अशी सूचना रोहित पवार यांनी दिली. खासदार भास्कर भगरे, प्रदेश प्रवक्ते विलास लवांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार आदी उपस्थित होते.