पंचवटी : पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनपा प्रभाग क्रमांक १ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रभागात आतापर्यंत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. आता मनपा निवडणुकीत शिंदेसेनेने नवखे, परंतु मातब्बर उमेदवार देत शिंदेसेनेने पकड मजबूत केली आहे. प्रभागाला महापौर, स्थायी समिती सभापती, गटनेता अशी महत्त्वाची पदे दिल्याने माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते, माजी गटनेता अरुण पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे भाजप यंदाही गड राखणार की शिंदेसेना वरचढ ठरणार, हे बघणे औचित्याचे ठरेल.
या प्रभागामध्ये दिंडोरीरोड, म्हसरूळ परिसराचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत प्रभागातून भाजपच्या रंजना भानसी, गणेश गिते, अरुण पवार, पूनम धनगर चौघे निवडून आले होते. यंदा भाजपने तिघांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवत धनगर शिंदेसेनेत गेल्याने त्यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या सहायकाच्या पत्नी रूपाली नन्नावरे यांना संधी दिली आहे
तर दुसरीकडे शिंदेसेनेने नयना रामवंशी, मनसेकडून प्रिया गांगुर्डे, वंचितकडून राणी जाधव व सविता म्हस्के, निकिता गायकवाड, जयश्री जाधव, प्रियांका गांगुर्डे अपक्ष उमेदवार आहेत.
नन्नावरे प्रभागातील नसल्याने अनुसूचित जाती महिला जागेसाठी भाजपातील डझनभर इच्छुकांनी आमदार अॅड. राहुल ढिकले यांची भेट घेत शहराध्यक्ष सुनील केदार यांना भेटत नाराजी व्यक्त करत प्रभागाबाहेरील उमेदवार दिल्यास विरोध केला जाईल हे स्पष्ट केले, असे असताना नन्नावरे यांनाच उमेदवारी दिली.
अनुसूचित जमाती सर्वसाधारण जागेवर माजी महापौर भानसी यांची सरळसरळ लढत यापूर्वी या प्रभागात माजी नगरसेवक असलेल्या गणेश चव्हाण यांच्याशी होईल. या ठिकाणी काँग्रेसचे विशाल पोर्टीदे रिंगणात आहेत.
स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनी पत्नी दीपाली गिते यांना निवडणूक रिंगणात उतरविले असून, त्यांची लढाई शिंदेसेना पक्षाच्या उर्मिला निरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना पेलमहाले, उद्धवसेनेच्या अनिता पेलमहाले यांच्यात होईल. राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेनेचे विशेष प्राविण्य नसल्याने मुख्य लढत भाजप विरुद्ध शिंदेसेनेत होईल.
दुसरीकडे सर्वसाधारण गटात माजी नगरसेवक अरुण पवार यांना उमेदवारी दिल्याने भाजप सरचिटणीस अमित घुगे यांनी बंडखोरी करून भाजपला आव्हान दिले आहे. घुगे यांचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर त्याचा फायदा शिंदेसेना पक्षाच्या उमेदवाराला निश्चितच होऊ शकतो. या प्रभागात प्रवीण पवार यांच्याविरोधात शिंदेसेनेने प्रवीण जाधव, काँग्रेसने विश्वास मोराडे, आपने प्रवीण बकुरे यांना निवडणुकीत उतरविले आहे. पक्षीय प्रभाव व नातेगोते यावर मतदान होणार असल्याने प्रभागातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
Web Summary : Nashik's Ward 1 witnesses a fierce battle between Shinde Sena and BJP, a traditional stronghold. Key BJP figures face challenges from Shinde Sena's strong candidates and internal dissent, making the outcome uncertain. Local factors and candidate networks will decide the winner.
Web Summary : नासिक के वार्ड 1 में शिंदे सेना और भाजपा के बीच कड़ी टक्कर है। भाजपा के गढ़ में शिंदे सेना के मजबूत उम्मीदवार चुनौती दे रहे हैं, जिससे मुकाबला अनिश्चित है। स्थानीय कारक और उम्मीदवार नेटवर्क परिणाम तय करेंगे।