इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला ठेऊन नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्ये करण्यात आली.नाशिकच्या हॉटेल ट्रीट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. राष्ट्रवादी व शिवसना युतीच्या वतीने मंत्री नरहरी झिरवाळ यांनी युतीची घोषणा केली.
यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, शिवसेनेचे विजय करंजकर, सुर्यकांत लवटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, विजय करंजकर यांनी युतीबाबत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.
राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महायुती सरकार एकत्र काम करत आहे. त्यानुसार नाशिकमध्ये देखील महायुती म्हणून पुढे जायला हवे अशी सर्वांची भूमिका होती. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या बैठका देखील झाल्या. शेवटचा दिवस शिल्लक राहिला तरी देखील भाजपच्या वतीने कुठलाही निरोप न आल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने नाशिक महानगरपालिकेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कुणाला किती जागा देणार हा कुठलाही प्रश्न नसून इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यानुसार जागावाटप होईल अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यानुसार वाटाघाटी देखील सुरु होत्या. मात्र शेवटचा दिवस येऊन देखील कुठलाही निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत इलेक्टिव मेरिटला प्राधान्य देऊन उमेदवारांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असून नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक ती कामे करण्याचा आमचे प्राधान्य असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांची गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यानंतर देखील बैठका होत गेल्या. मात्र भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आणि वेळ कमी राहिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
मोठा भाऊ म्हणून आम्ही भाजपच्या निर्णयाची वाट बघत होतो. मात्र कुठलाही निरोप न आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गेल्या दोन तीन दिवसांपासून आम्ही चर्चा करून निवडणूक लढविण्याची तयारी करत होतो. पक्षातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाऊ नये यासाठी आम्ही अंतिम टप्यात हा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शिवसेना मोठ यश मिळवेल असा विश्वास विजय करंजकर यांनी व्यक्त केला.
Web Summary : NCP and Shinde Sena will contest Nashik Municipal Corporation elections together. BJP's lack of response led to this alliance, prioritizing electable candidates.
Web Summary : एनसीपी और शिंदे सेना नासिक महानगरपालिका चुनाव साथ लड़ेंगे। बीजेपी की प्रतिक्रिया की कमी के कारण यह गठबंधन हुआ, जिसमें जीतने वाले उम्मीदवारों को प्राथमिकता दी जाएगी।