मैत्रिणीची छेड काढल्याने पेव्हर ब्लॉकने ठेचले डोके; नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:51 IST2025-09-03T11:51:11+5:302025-09-03T11:51:30+5:30
नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी एकाची दगडाने ठेचून हत्या केल्यामुळे खळबळ उडाली.

मैत्रिणीची छेड काढल्याने पेव्हर ब्लॉकने ठेचले डोके; नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य
Nashik Crime: मैत्रिणीची छेड काढल्याच्या कारणावरून मनात राग धरून सोळा वर्षीय वयोगटातील तीन मुलांनी इसमाला भरदिवसा दगडाने ठेचून ठार मारलं. त्र्यंबक नाका परिसरात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी तिघा संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण घटनेनं घबराट पसरली आहे. हत्येनंतर पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
ठक्कर बाजार बसस्थानकाच्या परिसरातून तिघे अल्पवयीन मित्र हे त्यांच्या एका मैत्रिणीसोबत जात होते. यावेळी अनोळखी फिरस्त्या इसमाने त्यांच्या मैत्रिणीची छेड काढली. त्याचा राग आल्याने तिघांनी मिळून त्र्यंबक नाका येथून सीबीएसकडे येणाऱ्या रस्त्यावर ठक्कर बाजार बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगत पदपथावर पेव्हर ब्लॉक डोक्यात टाकून निघृण खून केला.
रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतरसुद्धा ही अल्पवयीन मुले त्या फिरस्त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारत होते. तो इसम मृत्युमुखी पडल्याचे बघून त्यांनी बसस्थानकात पळ काढला. यावेळी घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना व गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मेळा बसस्थानकाच्या आवारातून गुन्हे शाखेच्या पथकाचे वाहन आत येताच तिघे अल्पवयीन पळू लागले. यामुळे पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भांड, विशाल देवरे, मुख्तार शेख, विशाल काठे, नझीमखान पठाण यांच्या पथकाने शिताफीने पाठलाग करत ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलांनी पेव्हर ब्लॉकने ठेचून ज्याला ठार केलं त्या भिकाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाहून पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांची न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेची फॉरेन्सिक व्हॅन तातडीने घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी पुरावे गोळा केले.
मित्रांनीच जमिनीवर ढकलल्याने तरुणाचा संशयास्पद मृत्यू
नाशिक शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या टिळकवाडी सिग्नल परिसरात मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या तिघा युवकांमध्ये शाब्दिक वाद झाले. यावेळी मित्रांनी राजू ऊर्फ शानू सौदाप्पा वाघमारे याला ढकलून दिल्याने तो जमिनीवर कोसळून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. वाघमारे याला रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातून घेऊन गेलेल्या त्याच्या मित्रांनी घातपात केल्याचा संशय त्याच्या भावाने व्यक्त केला आहे.
राजीव गांधी भवनाशेजारी पदपथाजवळ एका दुकानाबाहेर तिघेजण दुचाकीने पहाटे आले. त्यांनी येथील त्यांच्या ओळखीच्या खासगी सुरक्षारक्षकाकडे तंबाखू मागितली. यावेळी तिघांमध्ये वाद झाले. सुरक्षारक्षकाने मध्यस्थीचा प्रयत्नही केला; मात्र वाघमारे याने पार्किंगमधील लोखंडी पाइप हलवून उपसला आणि उगारण्याचा प्रयत्न केला असता त्याला त्याच्या इतर काही मित्रांनी ढकलून दिले. यावेळी तो बेशुद्ध पडला होता, असे सरकारवाडा पोलिसांनी सांगितले. त्याला तातडीने त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी वाघमारेला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सकाळी विविध सराफी दुकानांचे सीसीटीव्ही तपासले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.