कौमार्य चाचणी, नवऱ्याचे ते फोटो अन्...; लग्नानंतर ६ महिन्यात स्वतःला संपवलं, म्हणाली,"रोज मरण्यापेक्षा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:46 IST2025-11-27T12:43:25+5:302025-11-27T12:46:50+5:30
नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून सहा महिन्यातच विवाहितेने स्वतःला संपवल्याची घटना घडली.

कौमार्य चाचणी, नवऱ्याचे ते फोटो अन्...; लग्नानंतर ६ महिन्यात स्वतःला संपवलं, म्हणाली,"रोज मरण्यापेक्षा..."
Nashik Crime: 'भाऊ, तुम्ही मला खूप प्रेमाने वाढविले पण माझे नशीब खराब, रोज थोडं-थोडं मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपत आहे अशी सात पानांची चिठ्ठी लिहून पंचवटीत नवविवाहितेने जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. नेहा बापू डावरे ऊर्फ नेहा संतोष पवार असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पंचवटीमधील संजयनगर परिसरात राहणाऱ्या नेहा हिचा विवाह जून महिन्यात संतोष पवार नामक युवकासोबत झाला होता. विवाहानंतर जेमतेम महिनाभरानंतर पती, सासू, तसेच नणंदेकडून तिचा विविध कारणांनी शारीरिक-मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर नेहा हिने बुधवारी राहत्या घरी विष प्राशन केले. ही घटना भावाला समजतात त्याने तत्काळ तिच्या घरी धाव घेत तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
माहेरी जाते, माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते, असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेत कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार पती व नणंदेकडून करण्यात आल्याची संतापजनक बाबसुद्धा तिने चिठ्ठीत लिहिली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, तसेच सात पानांची चिठ्ठी तपासाकरिता जप्त केली असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं?
माझ्या भावांनी माझं लग्न दोन हजार लोकांमध्ये धूमधडाक्यात १५ लाख खर्चुन करून दिले. माझे पती संतोष पवार यांना ५ ग्रॅमची सोन्याची, तसेच चांदीची अंगठी दिली. घरातील नणंदेसह जवळच्या दुसरी नणंद, सासूकडून सतत छळ करतात. माझ्या नवऱ्याचे लग्नापूर्वीच प्रेमसंबंध होते. त्यांनी तसे फोटोदेखील दाखवले आहेत. माहेरून जादूटोणा करून आणल्याचा संशय घेत पर्स तपासली. मासिक पाळी आली होती का, असे खोटे बोलते सांगून सासूने नणंदेला व माझ्या पतीला तपासायला भाग पाडले. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यानंतर रक्तस्राव झाला नाही म्हणून नवऱ्याने १५-२० दिवस चारित्र्यावर संशय घेतला.