Nashik News: बहीण भाऊ दुचाकीवरून निघाले होते. पण, रस्त्याच मृत्यूने बहिणीला गाठलं. पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअप गाडीने दुचाकीसह इतर काही वाहनांना उडवले. यात भावासोबत दुचाकीवरून जात असलेल्या २३ वर्षीय जयश्री गंभीर जखमी झाली. तिने भावासमोरच प्राण सोडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाशिकमधील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. जयश्री सोनवणे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री तिचा भाऊ सुमितसोबत दुचाकीवरून जात होते. रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि फटफटत नेले. पिकअपने इतर तीन दुचाकी आणि एक ओमनी गाडीलाही धडक दिली.
ही धडक इतकी भयंकर होती की, जयश्री आणि सुमित गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही क्षणातच जयश्रीचा जागेवरच मृत्यू झाला. भावाच्या डोळ्यासमोरच तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेत सुमितही गंभीर जखमी झाला.
दुसऱ्या दुचाकीवरील दोघेही जखमी
पिकअपने धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील जयदेव महाले आणि भारत महाले हे दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. जयश्रीचा भाऊ सुमितची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताचं चालकाने काय सांगितलं कारण?
ज्या पिकअप गाडीने धडक दिली, त्या गाडीच्या चालकाचे नाव अनिल साळवे आहे. अपघात झाली, त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती समोर आली आहे. पण, प्राथमिक चौकशीमध्ये चालकाने वेगळे कारण सांगितले आहे.
चालकाच्या मांडीवर त्याचा मुलगा बसलेला होता. त्याने अॅक्सलेटर दाबल्याने गती वाढून अपघात झाला, असे आरोपीने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.