"बायकोचा बैल झालाय, आमचं ऐकत नाही"; आई वडिलांचे टोमणे असह्य, लेकाने दोन्ही मुलांसह स्वतःला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:55 IST2025-11-27T11:35:20+5:302025-11-27T11:55:38+5:30
आई वडिलांच्या टोमण्यांमुळे पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचे पत्नीने म्हटलं.

"बायकोचा बैल झालाय, आमचं ऐकत नाही"; आई वडिलांचे टोमणे असह्य, लेकाने दोन्ही मुलांसह स्वतःला संपवलं
Nashik Crime: चांदवड तालुक्यातील दिघवद येथील रोकडोबा वस्तीवरील विहिरीत पित्याने आपली नऊ वर्षांची मुलगी व पाच वर्षांच्या मुलासह उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, आपल्या पतीला सासू सासरे यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद पत्नीने चांदवड पोलिसात दिल्याने सासू सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनीदिलेल्या माहितीनुसार, दिघवद येथील रोकडोबा वस्तीवरील दौलत उर्फ सचिन रामभाऊ हिरे (३५) हे दिघवद ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची मुलगी प्रज्ञा दौलत हिरे (९), मुलगा प्रज्वल दौलत हिरे (५) यांच्यासह राहत्या घराच्या समोरील विहिरीत उड्या घेतल्याने पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिघांनाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
मानसिक छळामुळे आत्महत्येचा आरोप
या आत्महत्येबाबत दौलत हिरे यांच्या पत्नीने चांदवड पोलिसात फिर्याद दिली. "दौलत हिरे यांच्यासोबत सप्टेंबर २०१४मध्ये माझा विवाह झाला. तेव्हापासून माझे सासरे रामभाऊ भाऊराव हिरे, सासू मीना रामभाऊ हिरे हे नेहमी घरातील कामावरून पती दौलत यांचा मानसिक छळ करत होते. तू माजला आहे, आमचे ऐकत नाही, बायकोचा बैल झाला आहे, असे वेळोवेळी सासू- सासऱ्यांनी हिणवल्यानेच पतीने आत्महत्या केली असा आरोप पत्नीने केला.
बुधवारी सासू-सासरे यांचे पतीशी भांडण झाल्याने त्यांनी दोन्ही मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे पत्नीने म्हटले. पोलिसांनी त्यानुसार सासू - सासरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.