पोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याचा अत्याचार; सोनोग्राफीनंतर समोर आला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:46 IST2025-09-10T18:46:20+5:302025-09-10T18:46:20+5:30
नाशिकमध्ये पित्यानेच मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याचा अत्याचार; सोनोग्राफीनंतर समोर आला धक्कादायक प्रकार
Nashik Crime: नाशिकमध्ये जन्मदात्या पित्याने नात्याला काळिमा लावणारे कृत्य केल्याचे समोर आलं आहे. पित्यानेच अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. सोनोग्राफीनंतर उजेडात आलेल्या या गैरकृत्याचा गंगापूर पोलिसांनी छडा लावला. डीएनए नमुन्यांची चाचणी अहवालावरून पोलिसांनी आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.
एका परप्रांतीय कुटुंबातील सतरा वर्षीय मुलीला महिनाभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी तिच्या आईने दाखल केले होते. तिथे तपासणी केल्यानंतर पोटदुखी व पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार पीडितेने सांगितली. यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ती मुलगी सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत पीडित मुलगी व तिच्या आईसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या मायलेकींसह तिच्या वडिलांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करुन तपास सुरु केला.. पथकांनी पीडित मुलीच्या गर्भाचे डीएनए नमुने गोळा करत तपासणीला पाठवून दिले.
मात्र पोलिसांनी डीएनए नमुने घेतल्याचे कळल्यापासूनच मुलीचा बाप पसार झाला होता. त्याने त्याचा मोबाइल हा घरीच ठेवून पळ काढला. त्यामुळे त्याचे लोकेशन शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले होते. मात्र पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करत सीबीएस भागातून आरोपी पित्याला ताब्यात घेतले.
पीडित मुलगी ही नाशिक येथे पित्यासोबत राहण्यास होती. तर तिची आई ही वारंवार तिच्या मूळगावी निघून जात होती. यामुळे दोन्ही पथकांना सरतेशेवटी पीडितेच्या वडिलांवर संशय आला. पूनम पाटील यांनी तिच्या वडिलांचे डीएनए नमुने घेतले आणि तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले. तपासणीमध्ये वडिलांनी पीडितेवर अत्याचार केल्याचे समोल आले.