"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:22 IST2026-04-03T13:21:31+5:302026-04-03T13:22:54+5:30

नाशिकमधील ढोंगी बाबा अशोक खरातच्या मुलाने SIT समोर मोठा खुलासा केला आहे. घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत असल्याचे त्याने कबूल केले आहे. 

nashik fake baba ashok kharat son revelation sit investigation money laundering | "आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली

"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली

आध्यात्मिकतेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ढोंगी बाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. विशेष तपास पथकाने केलेल्या कडक चौकशीसमोर खरातच्या मुलानेच गुडघे टेकले असून, आपल्या वडिलांच्या काळ्या साम्राज्याचा असा कच्चाचिठ्ठा मांडला आहे की पोलीसही चक्रावून गेले आहेत. "आमच्या घरात नोटांच्या थप्प्या यायच्या आणि त्यावर पूर्णपणे माझ्या वडिलांचे नियंत्रण होते," अशी कबुली मुलाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुलानेच फोडले घबाड

SITने अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितले की, "घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणली जात असे. हा पैसा नेमका कुठून येतोय, हे मला माहीत नसायचे; पण या संपूर्ण आर्थिक व्यवहारावर माझे वडील अशोक खरात यांचे थेट नियंत्रण होते. प्रत्येक रुपया त्यांच्या आदेशानुसारच येत आणि जात असे." मुलाच्या या जबाबामुळे खरातच्या घरात पैशांचे मोठे अवैध जाळे सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोठ्या हवाला रॅकेटचा संशय

मुलाने दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी आता या प्रकरणात मोठ्या हवाला रॅकेटचा संशय व्यक्त केला आहे. भाविकांकडून लुटलेली रक्कम पांढरी करण्यासाठी खरातने अनेक आर्थिक क्लृप्त्या लढवल्या होत्या. एसआयटीने ईशान्येश्वर मंदिराच्या शिवनिका संस्थेच्या तीन संचालकांना समोरासमोर बसवून चौकशी केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आढळून आली असून, या संस्थांचा वापर शेल कंपन्यांप्रमाणे काळा पैसा जिरवण्यासाठी केला जात होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

भीती दाखवून शोषण आणि लूट

अशोक खरात याची कार्यपद्धती अत्यंत क्रूर होती. तो लोकांच्या श्रद्धेशी खेळण्यात माहीर होता. "देव तुमच्यावर कोपला आहे" किंवा "तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येणार आहे," अशी भीती तो भाविकांना दाखवायचा. हे कथित संकट टाळण्यासाठी विशेष पूजा-अर्चा करण्याच्या नावाखाली तो लाखो रुपये उकळायचा. याच मानसिक दबावाचा फायदा घेऊन त्याने अनेक महिला भाविकांचे लैंगिक शोषण केल्याचेही समोर आले आहे.

आर्थिक ऑडिट आणि बड्या नावांचा पर्दाफाश होणार?

खरातने भाविकांच्या पैशातून अफाट माया जमवली आहे. एसआयटी आता त्याच्या सर्व बँक खात्यांची, बेनामी मालमत्तांची आणि गुंतवणुकीच्या कागदपत्रांची कसून तपासणी करत आहे. लवकरच शिवनिका संस्थेचे सविस्तर फायनान्शिअल ऑडिट केले जाणार आहे. खरातच्या मुलाने दिलेल्या माहितीनंतर या सिंडिकेटमध्ये सामील असलेल्या काही मोठ्या नावांचा खुलासा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Web Title: nashik fake baba ashok kharat son revelation sit investigation money laundering