Nashik Doctor Crime: पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राच्या मदतीने कारमध्येच गर्भलिंग निदान, बड्या डॉक्टरचे कसे फुटले बिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:30 IST2025-11-25T17:30:10+5:302025-11-25T17:30:59+5:30
गर्भलिंग निदान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण, तरीही असे प्रकार होतच आहे. अनेक रुग्णालयावर धाडी टाकल्या गेल्या. पण, नाशिकमधील एका डॉक्टरने रुग्णालयात गर्भलिंग निदान मशीन लावण्याऐवजी कारमध्येच लावली. त्यानंतर....

Nashik Doctor Crime: पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राच्या मदतीने कारमध्येच गर्भलिंग निदान, बड्या डॉक्टरचे कसे फुटले बिंग?
Nashik Crime : अवैधरीत्या चारचाकी वाहनांमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बागळून गर्भलिंग निदान करणाऱ्या चाळीसगाव येथील डॉ. बाळासाहेब नारायण पाटील याच्या विरोधात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्ण निदान तंत्र अधिनयमातील तरतुदीअन्वये गुन्हा दाखल केला आहे. विनापरवानगी सोनोग्राफी यंत्राची विक्री केल्याबद्दल यंत्र तयार करणाऱ्या कंपनीलादेखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.
वडाळा-पाथर्डी रोडवर इंदिरानगर पोलिसांकडून सुरू असलेल्या वाहनांची तपासणीदरम्यान गत १७ मार्च २०२५ रोजी प्रकार उघडकीस आला होता. या रस्त्यावरून जाणाऱ्या मारुती स्वीफ्टवर (एमएच १९, डीव्ही- १३७८) संशय आल्याने पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यांना एक पोर्टेबल यंत्र आढळून होते.
सदर यंत्राची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता सोनोग्राफी यंत्र असल्याचे समोर आले. या यंत्राच्या माध्यमातून संबंधितांकडून गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने पोलिसांनी वाहनासह सोनोग्राफी यंत्र जप्त केले. सदर प्रकार नाशिक महापालिका हद्दीत घडल्याने पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे वर्ग करण्यात आले होते.
समितीला तपासात काय आढळून आले?
महापालिकेच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. वाहनाच्या क्रमांकावरून जळगाव आरटीओ कार्यालयातून वाहनमालकाची माहिती घेण्यात आली. या प्रकरणात सोनोग्राफीचे पोर्टेबल यंत्र विनापरवानगी बाळगणे, यंत्राची विनापरवाना वाहतूक करणे हे दोष सिद्ध झाले. त्यामुळे सदर वाहनासोबत आढळून आलेले चाळीसगाव येथील डॉ. बाळासाहेब नारायण पाटील यांच्याविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनयिमातील कलम ३, ६, १८, २३, २५, २६ व २९ अन्वये जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रात सोनोग्राफी यंत्र विक्री करताना संबंधित कंपनीने महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या प्रकरणात अशा प्रकारची परवानगी न घेता डॉ. पाटील यांना सोनोग्राफी यंत्र विक्री करण्यात आले होते.
..तर डॉक्टरला पाच वर्षांची कैद
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाख केल्यानंतर आता जिल्हा न्यायालयात खटला चालणार आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास डॉ. पाटील यांना पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता असून त्यांचे वैद्यक प्रमाणपत्रही रद्द होऊ शकते.
"वाहनात पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र विनापरवाना बाळगल्याबद्दल, तसेच विनापरवाना या यंत्राची वाहतूक केल्याप्रकरणी डॉ. बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे", अशी माहिती नाशिक महापालिकेचे मुख्य आरोग्य आणि वैद्यकीय अधिकारी विजय देवकर यांनी दिली आहे.