Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:53 IST2025-04-30T15:46:48+5:302025-04-30T15:53:02+5:30

Nashik News marathi: नाशिकमधील कामटवाडे भागात करण उमेश चौरे या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. रस्त्यात गाठून त्याच्यावर दगड आणि फरशीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Nashik Crime: Karan Chaure was murdered on the orders of Harshad Patankar; Shocking information came to light during the investigation | Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती

Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती

Nashik Latest News: मित्राच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने पूर्ववैमनस्यातून पाचजणांच्या टोळीने कामटवाडे भागात भरदिवसा एका अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने काही तासांत पाचजणांना अटक केली असून, त्यामध्ये दोघे अल्पवयीन आहेत. सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून करण उमेश चौरे (१७, रा. संत कबीरनगर) याचा खून केल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मागील महिन्यात मध्यरात्री संत कबीरनगर येथे अरुण राम बंडी या युवकाचा टोळक्याने निघृणपणे खून केला होता. या गुन्ह्यात गंगापूर पोलिसांनी संशयित करण उमेश चौरे (१७, रा.संत कबीरनगर, झोपडपट्टी) यास ताब्यात घेतले होते. त्याची बालनिरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली होती. तो अल्पवयीन असल्याने आठवडाभरापूर्वीच त्याची सुटका झाली होती.

उमेश चौरेला रस्त्यात गाठलं अन् सहा जणांनी संपवलं

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (२८ एप्रिल) दुपारी २ वाजेच्या सुमारास करण हा कामटवाडे येथील स्मशानभूमी रोडवरून जात होता. यावेळी सहा हल्लेखोरांच्या टोळक्याने त्यास तेथे घेरले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. दगड व फरशीने करणच्या डोक्यावर मारल्याने तो जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

पोलिसांनी आरोपीचा कसा घेतला शोध?

यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. भरदिवसा रस्त्यावर झालेल्या या खुनाच्या घटनेने परिसर हादरून गेला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१चे पथकाने समांतर तपास सुरू केला असता अंमलदार विशाल काठे व प्रशांत मरकड यांना या खुनातील संशयित आरोपी हे बापू पुलाच्या परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. 

 वाचा >>तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना कळविले. कड यांनी पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, प्रवीण वाघमारे, नाझीमखान पठाण, मुख्तार शेख, विशाल देवरे आदींच्या पथकाने सापळा रचला. 

पोलिसांची जीप ओळखली अन् आरोपी पळत सुटले

यावेळी काही मुलांनी पोलिसांची साधी जीप ओळखली आणि पुलाच्या परिसरातून पळ काढण्यास सुरुवात केली असता पथकाने पाठलाग करून संशयित मोहन ज्ञानेश्वर वायचळे (१८, रा. कामगारनगर), राहुल राजू गडदे (२०), साहिल पिंटू जाधव (२१, दोघे रा.आनंदवल्ली) आणि दोघे अल्पवयीन अशा पाच मुलांना पकडले. 

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी करणच्या खुनाची कबुली देत सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून हा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. यामुळे आता पोलिसांनी फरार पाटणकरच्या दिशेने मोर्चा वळविला आहे. या संशयितांना पुढील तपासाकरिता अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

अरुण बंडी हा पाटणकरच्या गँगमधील

सराईत गुन्हेगार पाटणकर याचा या खुनाच्या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. यामुळे आता पोलिसांकडून त्याची चौकशी केली जाऊ शकते. 

महिनाभरापूर्वी अरुण बंडी याचा खून करण्यात आला होता. हा बंडीदेखील पाटणकराच्या टोळीतील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे त्याच्या सांगण्यावरून टोळीने करणचा खून केल्याचा कयास पोलिसांनी संशयितांच्या चौकशीअंती दिलेल्या जबाबावरून लावला आहे.

भावाचा सल्ला ऐकला असता तर...

करण याला त्याचा भाऊ आकाश याने नाशिक शहर सोडून त्याच्या मूळगावी परजिल्ह्यात जाण्यास सांगितले होते. मात्र त्याने त्याचा सल्ला न ऐकता कामटवाडे सिडको भागात राहणाऱ्या त्याच्या मित्राकडे राहायला जातो, असे सांगितले. 

संशयितांनी त्याचा माग काढून अखेर काटा काढला. भावाचा सल्ला ऐकला असता तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी चर्चा परिसरात सुरू होती.

Web Title: Nashik Crime: Karan Chaure was murdered on the orders of Harshad Patankar; Shocking information came to light during the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.