Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:51 IST2025-11-24T15:49:31+5:302025-11-24T15:51:32+5:30
एका महिलेला कॉल आला. समोरून बोलणारी महिला म्हणाली, 'तुझ्या पतीला बलात्कार, पोक्सो गुन्ह्यात अडकवायचं नसेल, तर पाच लाख दे आणि पटकन ये.' नंतर...

Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
Nashik Crime news Latest: नाशिकरोड परिसरात एका विवाहितेकडे पतीवर खोटा बलात्कार आणि पॉक्सो गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, पाच लाखांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी चार महिलांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेल रोड येथील प्रमिला कैलास मैंद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सायंकाळी त्यांना कॉल आला. त्यांच्या पतीला पॉक्सोअंतर्गत फसवून गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत, त्वरित जेल रोडच्या चरणदास मार्केट येथे येण्यास सांगण्यात आले.
प्रमिला महिलेने बोलवलेल्या ठिकाणी गेल्या अन्...
प्रमिला या मुलगा तेजस आणि आईच्या मैत्रिणीसह ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या. तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी महिलेने स्वतःचे नाव अर्चना परदेशी असे सांगितले. तिने काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून तुमच्या खोटा बलात्काराचा पतीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगत, हे प्रकरण थांबवायचे असल्यास पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.
प्रमिला यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. शनिवारी सायंकाळी पुन्हा त्यांना एमएसईबी कॉलनीजवळ भेटण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र, मैंद यांनी पोलिसांना कळविण्याचा प्रयत्न करताच, त्या महिला पळून गेल्या.
उपनगर पोलिसांनी अर्चना परदेशी, स्नेहल भालेराव, कविता पवार आणि रंजना कांबळे या चौघींविरुद्ध खंडणी व धमकीचे गुन्हे नोंदविले असून, पुढील तपास सुरू आहे.