Nashik Latest News: दीड महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात रंगपंचमीच्या रात्री नाशिकमधील बोधलेनगरच्या पाठीमागे असलेल्या आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्याने उमेश व प्रशांत जाधव या सख्ख्या भावांचा एकापेक्षा जास्त शस्त्राने वार करीत निघृणपणे खून करण्यात आला होता. खुनात वापरलेले दोन मोठे कोयते व एक लहान कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. या कोयत्यांवर रक्ताचे डागदेखील 'जैसे थे' असल्याचे सूत्रांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून १९ मार्च रोजी आंबेडकरवाडीमध्ये जाधव बंधूंच्या दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या खून प्रकरणात सखोल तपासाकरिता स्वतंत्ररीत्या स्थानिक विशेष तपास पथकाने 'एसआयटी' स्थापन केली आहे.
वाचा >>इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
गोळ्या महाजनच्या घरात होते कोयते
या गुन्ह्यात एसआयटीकडून आतापर्यंत दोन संशयित आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, दुचाकी तसेच हत्यारेदेखील जप्त करण्यात आली आहेत. आठवा संशयित आरोपी रिक्षाचालक नीलेश उर्फ गोळ्या शांताराम महाजन याच्या घरात तीन कोयते एका गोणीत दडवून ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी महाजन याची कसून चौकशी केल्यानंतर रविवारी (४ एप्रिल) त्याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली.
दोन भावांच्या हत्याकांडात कुणाला झाली अटक?
या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी संशयित सागर मधुकर गरड, अनिल विष्णू रेडेकर, सचिन विष्णू रेडेकर, योगेश चंद्रकांत रोकडे, अविनाश ऊर्फ सोनू नानाजी उशिरे, योगेश मधुकर गरड, मंगेश चंद्रकांत रोकडे यांना अटक केली असून, त्यांची चौदा दिवसांची पोलिस कोठडी सोमवारी (५ एप्रिल) संपली.
कोयते दिले अन् म्हणाले फोन करू नको!
गुन्हा घडल्यापासून महाजन हा काही दिवस फरार झाला होता. यानंतर पुन्हा शहरात येऊन रिक्षा चालवू लागला होता.
आरोपींनी त्याच्याकडे गुन्ह्यातील कोयते देऊन त्यांना फोन करायचा नाही, असे सांगितले होते. यामुळे महाजनला वाटले की पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तो निर्धास्तपणे वावरत होता.
तो यापूर्वी भांगेच्या गोळ्यांची विक्री करायचा म्हणून त्याला 'गोळ्या' या टोपणनावाने ओळखतात. नीलेश या नावापेक्षा तो गोळ्या नावानेच जास्त परिचित आहे, असे पोलिसांनी सांगितले.