Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:20 IST2025-12-25T16:18:17+5:302025-12-25T16:20:11+5:30
Nashik: उद्धव सेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून उद्धव सेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला. यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. माझा कोणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध नाही. परंतु, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ मिळणार नसेल, तर हे बरोबर नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशाला त्यांचा विरोध असल्याची चर्चा होती, त्यावर स्पष्टीकरण देताना फरांदे म्हणाल्या की, "माझा कोणाच्याही पक्षप्रवेशाला व्यक्तिगत विरोध नाही. मात्र, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे काही मत होते. त्या मतदारसंघात बबलु शेलार यांच्यासारखा सक्षम उमेदवार आधीच पक्षात आला आहे, त्यांच्यासोबत पक्षाचे निष्ठावंत उमेदवार घेऊन पॅनेल केले असते, तर शंभर टक्के पक्षाचा विजय झाला असता. वर्षानुवर्षे कार्यकर्ते पक्षासाठी काम करत आहेत आणि ते निवडून येण्याचे संकेत दिसत असतील तर, त्यांना संधी मिळाली पाहिजे."
गेल्या चार दशकांपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या देवयानी फरांदे यांनी प्रथमच पक्षाच्या निर्णयावर उघडपणे भाष्य केले. "गेल्या ४० वर्षांत मी कधीही अशी जाहीर भूमिका घेतली नव्हती. मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पण जर प्रत्येक नेता फक्त स्वतःचा विचार करणार असेल, तर सामान्य कार्यकर्त्याला पाठबळ कोणी द्यायचे?" त्या पुढे म्हणाल्या की, वरिष्ठ पदाधिकारी म्हणून नवीन आलेल्या नेत्यांचे स्वागत करते. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्यासमोर कार्यकर्त्यांना डावलले जात असेल, तर ते मला आवडलेले नाही."