दगडाने ठेचून भाजीपाला विक्रेत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:58 AM2021-11-25T01:58:23+5:302021-11-25T01:58:49+5:30

पंचवटी, म्हसरुळ परिसरासह सिडको भागातसुद्धा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याची वाट अडवून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर दगड टाकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२४) उघडकीस आला. राजेश ऊर्फ राजू वकील शिंदे (३५, भराडवाडी, पेठ रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Murder of a vegetable seller by crushing a stone | दगडाने ठेचून भाजीपाला विक्रेत्याचा खून

दगडाने ठेचून भाजीपाला विक्रेत्याचा खून

Next
ठळक मुद्देहल्लेखोरांचा शोध सुरू : पेठरोडवर मध्यरात्री घडला प्रकार; लागोपाठ खुनांच्या घटनांनी पोलिसांपुढे आव्हान

नाशिक : पंचवटी, म्हसरुळ परिसरासह सिडको भागातसुद्धा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याची वाट अडवून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर दगड टाकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२४) उघडकीस आला. राजेश ऊर्फ राजू वकील शिंदे (३५, भराडवाडी, पेठ रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाशिक शहर पोलिसांकडून गुन्हेगारांच्या टोळ्यांवर एकीकडे मोक्काची कारवाई केली जात असताना दुसरीकडे गुंडांमधील वर्चस्ववाददेखील उफाळून येताना म्हसरुळ, पंचवटी परिसरात दिसून येत आहे. सराईत गुन्हेगार प्रवीण काकडची त्याच्याच गुंड मित्रांनी केलेल्या हत्येला काही तास उलटत नाही, तोच पुन्हा पंचवटी मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राजू शिंदे या व्यक्तीची डोक्यात हल्लेखोरांनी दगड टाकून आणि चेहरा दगडाने ठेचून मध्यरात्री पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळच हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अत्यंत वर्दळीचा मुख्य रस्ता असतानाही हल्लेखोरांनी शिंदे यांची वाट रोखली. ते बुलेट दुचाकीने आपल्या भराडवाडी येथील घराकडे जात होते. यावेळी हल्लेखोरांनी त्यांना थांबवून दगडाने हल्ला चढविला. डोके, चेहरा दगडाने पूर्णत: गंभीरपणे जखमी करुन हल्लेखोर पसार झाले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने शिंदे रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमखी पडले. मयत शिंदे यांच्या पत्नी आरती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--इन्फो--

रात्री पेट्रोलिंग नेमकी असते कुठे?

लागोपाठ घडणाऱ्या खुनांच्या घटनांनी पंचवटी, फुलेनगर, भराडवाडी, म्हसरुळ परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य रस्त्यावर खुनाची घटना घडते; मात्र पोलिसांना त्याची कुठलीही कुणकुण लागत नाही, तर मग रात्रीच्यावेळी पोलिसांचे पेट्रोलिंग नेमके कोठे सुरू असते, असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

--इन्फो--

हल्लेखोरांच्या शोधार्थ तपासपथके

राजू शिंदे यांच्यावर हल्ला करून फरार झालेल्या संशयित आरोपींच्या शोधार्थ पंचवटी, म्हसरुळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथकांसह गुन्हे शाखा युनिटचे पथकेही रवाना झाली आहेत. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास खुनाची घटना घडली. बुधवारी उशिरापर्यंत शिंदे खूनप्रकरणातील संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते.

--कोट--

मयत शिंदे यांच्या पत्नी आरती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत काही इसमांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून कदाचित संशयितांनी शिंदे यांच्यावर हल्ला चढविला असावा असा अंदाज आहे. हल्लेखोरांच्या शोधात तीन ते चार तपासपथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना बेड्या ठोकण्यास यश येईल. नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये.

- डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी

Web Title: Murder of a vegetable seller by crushing a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.