पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 06:38 IST2025-08-06T06:37:26+5:302025-08-06T06:38:39+5:30
या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
नाशिकरोड : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका एकत्रित होणार नसून, त्या टप्प्याटप्प्याने होणार आहेत. कोणती निवडणूक आधी होईल, कोणती नंतर हे अद्याप निश्चित नाही. या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी दुपारी निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागाची निवडणूकपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित होते. यावेळी वाघमारे यांनी दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील, असे स्पष्ट करताना महापालिकेची निवडणूक आधी होईल की जिल्हा परिषदेची की पंचायत समित्यांची, हे तेव्हाच जाहीर होईल, असे नमूद केले. मतदानासाठी ईव्हीएम यंत्राचा वापर होणार आहे. परंतु, मतदाराला कोणाला मतदान केले, हे चिठ्ठीस्वरूपात दर्शविणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नाही. व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागत असल्याने त्याचा वापर केला जाणार नसल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
मध्य प्रदेशातून मागवणार २५ हजार ईव्हीएम
या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशमधून २५ हजार मतदान यंत्रे आणली जाणार आहेत. मध्य प्रदेशला लागून असणाऱ्या धुळे, नंदुरबार व अन्य जिल्ह्यांत त्यांचा वापर केला जाणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने नवीन मतदान यंत्रांची मागणी नोंदविली असून, ती ऑक्टोबरपर्यंत प्राप्त होतील, असे आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.
मतदार यादीत बदल नाही
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे येथील सोयीसुविधा, निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, आदींची तयारी व पूर्वनियोजन करण्याचे निर्देश दिल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. यासाठी मुख्य निवडणूक आयोगाची परवानगी मागितली असून, ती लवकरच मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.