नाशकात मुंबई नाका, उपनगरमध्ये घरफोड्या- सव्वादोन लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:48 IST2020-01-31T16:47:06+5:302020-01-31T16:48:51+5:30
नाशिक शहरात दिवसेंदिवस घरफो़ड़्य़ांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, शहरातील विविध भागात बंद घरांचे कुलुप तोडून घरातील सोने चांदिच्या दागिन्यांची लूट होत असताना पोलिसांकडून चोरट्यांवर कारवाई होत नसल्याने वेगवेगळ्या भागातील भुरट्या चोरांचे धाडस वाढले असून त्यांनी पोलिसांसमोर शहरातील घरफोड्या रोखण्याचे आव्हान निर्माण केले आहे.

नाशकात मुंबई नाका, उपनगरमध्ये घरफोड्या- सव्वादोन लाखांचा ऐवज लुटला
नाशिक : शहरातील मुंबई नाका व उपनगर भागात दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करुन तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
घरफोडीची पहिली घटना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपालीनगरमधील जयश्री आॅर्केड येथील राजेश रमाकांत कुलकर्णी ( ५३) याच्या घरात घडली. राजेश कुलकर्णी बाहेरगावी गेलेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कुलकणी यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घरफोडीची दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड भागातील जुना सायखेडा रोड येथील ओंकार हाईट्स येथे सिद्धांत अशोक जाधव (३०)यांच्या घरात घडली. सिद्धांत जाधव बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरटचाने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील दोन कपाटांतील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ८४ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरी वस्तीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा प्रकारे घरफोड्या व भूरट्या चोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.