मोटरमॅनने वाचवले दोन युवकांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:58 IST2018-10-05T15:58:15+5:302018-10-05T15:58:30+5:30
प्रसंगावधान : गणोरीच्या बहिरम यांचे सर्वत्र कौतुक

मोटरमॅनने वाचवले दोन युवकांचे प्राण
देसराणे (वार्ताहर):- कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील गणोरी येथील आदिवासी पाड्यातील रेल्वे मोटरमन पंडित नामदेव बहिरम यांनी दोन युवकांचे प्राण वाचवले. सदर घटना दिवा जंक्शनजवळ गेल्या बुधवारी (दि.३) घडली. बहिरम यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे मध्य रेल्वे प्रशासनासह सर्वत्र कौतुक होत आहे.
पंडित बहिरम हे मध्य रेल्वेत मोटरमॅन म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते मनमाड राज्यराणी एक्सप्रेसचे मोटरमॅन असून दि. ३ आॅक्टोबर रोजी राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड ते सीएसटी मार्गावर धावत असताना दिवा जंक्शन क्र ॉस केल्यावर मोटरमॅनला ट्रॅकवर दोन प्रवासी जखमी अवस्थेत दिसले. पुढील अपघात टळावा यासाठी त्या ट्रॅकच्या दिशेने येणा-या लोकलला मोटरमॅनने फ्लॅशर आणि हेडलाईट दाखवत थांबवण्याचा इशारा दिला. एक्सप्रेसचाही त्यांनी वेळीच ब्रेक लावला. स्वत: खाली उतरून त्यांनी जखमी प्रवाशांना गार्ड व्हॅनमध्ये नेले तसेच ठाणे येथील शासकीय रु ग्णालयात दखल करण्यात आले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आपली जबाबदारी सांभाळत प्रवाशांचे जीव वाचवणा-या बहिरम यांचे मध्य रेल्वेतर्फे कौतुक केले जात आहे.