ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:12 IST2025-12-19T14:12:06+5:302025-12-19T14:12:54+5:30
नाशिक महापालिकेच्या निवडणुका १५ जानेवारीला असून त्यासाठी गेल्या रविवारपासून मुलाखती सुरू झाल्या आहेत.

ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
नाशिक - महापालिका निवडणुकीचे नेतृत्व स्थानिक पातळीवर करत असलेल्या आमदार राहुल ढिकले यांची इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच पदावरुन गच्छंती झाली आहे. त्यांच्या जागी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची निवडणूक प्रमुखपदी अचानक झालेली नियुक्ती पक्ष कार्यकर्त्यांनाही अचंबित करणारी ठरली आहे. पक्षाचे नेते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी धक्कातंत्राचा वापर करून पैलवान ढिकले यांना छोबीपछाड दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुका १५ जानेवारीला असून त्यासाठी गेल्या रविवारपासून मुलाखती सुरू झाल्या आहेत. यंदा प्रथम भाजपाने आमदार राहुल ढिकले यांना निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केले. पक्षाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीच्या माध्यमातून पक्षातील सुमारे १ हजार इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. सर्व काही सुरळीत असताना बुधवारी अचानक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने आदेश जारी करत नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी दिली. सायंकाळपर्यंत सर्व मुलाखती सुरळीत असताना अचानक ही घोषणा झाल्याने पक्षात अनेकांना धक्का बसला.
आमदार ढिकले यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा सलग विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधात भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या गणेश गीते यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपा सोडून गेलेल्या अनेकांनी समर्थन दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गणेश गीते यांच्यासह अन्य पक्षात गेलेल्या सर्वांनीच प्रवेश केला होता. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या प्रवेशाची आमदार ढिकले यांना फारशी अडचण नसली तरी काहींनी आमदार ढिकले यांच्या दुर्धर आजारात त्यांना त्रासही दिला. त्यांची रॅलीही अडवली होती. त्यामुळे ढिकले नाराज होते. त्यांनी त्यावेळी कुठलीही प्रतिक्रिया दिली. नाही. मात्र २ दिवसांपूर्वी ढिकले यांनी एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य व्हायरल झाले. त्यात आपण सर्व प्रभागांत हस्तक्षेप करणार नाही मात्र व्यक्तिगत त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर ढिकले यांच्या पदावर गंडांतर आल्याचे सांगितले जाते.
'ही' असू शकतात ढिकले यांना हटवण्याची कारणे
- आमदार ढिकले हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे काहींची अडचण होती. त्यांना निवडणूक प्रमुखपदी कायम ठेवल्यास पक्षांतर करून आलेल्या काहींना उमेदवारी देण्यात अडचणी आल्या असत्या.
- कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि आमदार ढिकले यांच्यात फारसे सख्य नसल्याचे सांगितले जाते. त्या तुलनेत आमदार फरांदे यांनी अलीकडे महाजन यांच्याशी बरेचा जुळवून घेतल्याची चर्चा आहे.
- आमदार ढिकले यांचा व्हिडिओ म्हणजे पक्षाच्या विरोधातील भूमिका जाहीर करण्यासारखे आहे, असे काहींनी वरिष्ठ पातळीवर पटवून दिल्याचे सांगितले जाते. तेच निमित्त करून ढिकले यांना हटविण्यात आले.
दरम्यान, मी भाजपमध्ये पक्षशिस्तीचे पालन करणारा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी समर्थपणे पार पाडेन. फडणवीस यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम राहील अशी प्रतिक्रिया आमदार राहुल ढिकले यांनी दिली आहे.