नाशिक शहराचा मंत्रिपदाचा मान्सून पुन्हा कोरडाच जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 10:13 PM2019-10-12T22:13:53+5:302019-10-12T22:15:40+5:30

मुख्यमंत्र्यांकडून चांदवड-देवळ्यात भाजप उमेदवाराला मंत्रिपदाचा शब्द; नाशिक शहरी भागातील इच्छुकांच्या स्वप्नांवर फेरणार पाणी 

mla from nashik city may not get ministry in upcoming state government hints cm fadnavis | नाशिक शहराचा मंत्रिपदाचा मान्सून पुन्हा कोरडाच जाणार!

नाशिक शहराचा मंत्रिपदाचा मान्सून पुन्हा कोरडाच जाणार!

Next

- धनंजय वाखारे

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधा-यांसह विरोधकांकडून मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. नाशिक जिल्ह्यात नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण घुसळून निघाले आहे. बहुमतासाठी संख्याबळ हाच प्रमुख उद्देश समोर ठेवत शिवसेना-भाजप महायुती प्रचारात पुढे सरसावली आहे. त्याचाच भाग म्हणून मतदारांना विकासाची स्वप्ने दाखवितानाच उमेदवारांना मंत्रिपदाचीही ऑफरही दिली जात आहे. जिल्ह्यातील चांदवड येथील झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड-देवळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांना जाहीरपणो मंत्रिपदाचा शब्द दिला. त्यामुळे महायुती पुन्हा सत्तेत आल्यास आहेर यांचे मंत्रिपद निश्चित मानले जाऊ  लागले आहे. परिणामी, नाशिक शहरातील चारही मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून असलेला मंत्रिपदाचा अनुशेष भरला जाणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. आजवर नाशिक जिल्ह्यातून दहा आमदारांनी मंत्रिपदे भूषविली आहेत तर नाशिक शहरी भागातील मतदारसंघात केवळ तीनच मंत्रिपदे लाभलेली आहेत. 

नाशिक जिल्ह्यात आजवर 13 आमदारांनी मंत्रिपद भूषविलेले आहे. त्यात भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, बळीराम हिरे, विनायकदादा पाटील, ए.टी. पवार, तुकाराम दिघोळे, बबनराव घोलप, डॉ. दौलतराव आहेर, छगन भुजबळ, निहाल अहमद, प्रशांत हिरे, दादा भुसे यांचा समावेश आहे. 1962 ते 2004 र्पयत नाशिक शहरी भागात नाशिक व देवळाली हे दोनच विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात होते. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होऊन नाशिक शहराचे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली ह्या चार मतदारसंघांची निर्मिती झाली.

नाशिक शहरातून आजवर वसंत नारायण नाईक, विलास लोणारी, वसंत उपाध्ये, शांतारामबापू वावरे, डॉ. दौलतराव आहेर, गणपतराव काठे, डॉ. शोभा बच्छाव तसेच पुनर्रचनेनंतर वसंत गिते, उत्तमराव ढिकले, नितीन भोसले तर मागील निवडणुकीत देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि बाळासाहेब सानप यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे, तर देवळालीतून एस. एन. देशमुख, निवृत्ती गायधनी, बाबूराव अहिरे, भिकचंद दोंदे, बबनराव घोलप आणि योगेश घोलप यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 

नाशिक शहराला आजवर केवळ तीनच मंत्रिपदे वाटय़ाला आलेली आहेत. त्यात दौलतराव आहेर व बबन घोलप हे युती सरकारच्या काळात मंत्री होते, तर 2004 ते 2009 या पंचवार्षिक काळात कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना अल्पकाळासाठी मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. त्यानंतर गेल्या दहा वर्षात शहराला मंत्रिपदापासून उपेक्षित ठेवले गेले. मागील निवडणुकीत शहरातील चारपैकी तीन मतदारसंघात भाजप, तर देवळालीतून सेनेचा आमदार निवडून जाऊनही मंत्रिपद लाभले नाही. फडणवीस सरकारच्या दरवेळी होणा:या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत नाशिकमधील भाजप आमदारांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत चर्चिली गेली; परंतु अखेर्पयत ती चर्चाच राहिली. मावळत्या पंचवार्षिक काळात जिल्ह्याला दादा भुसे यांच्या रूपाने एकमेव राज्यमंत्रिपद लाभले. 

आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी महायुती सत्तेत आल्यास चांदवड-देवळा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना खासदारापेक्षा एक हजार जास्त मते मिळाल्यास मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे भाजपच्या कोटय़ातून जिल्ह्याचे एक मंत्रिपद निवडणुकीपूर्वीच आरक्षित झाल्याने नाशिक शहरी भागातील सत्ताधारी आमदार व आता उमेदवारी करणा:या देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या पुन्हा निवडून आल्यास त्यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंग पावणार आहे. शहरातील भाजपचे तिसरे आमदार बाळासाहेब सानप यांनी पक्षांतर करत राष्ट्रवादीचे घडय़ाळ हाती बांधल्याने त्यांचा पत्ता तसाही कापला गेला आहे. 

चांदवड-देवळा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर हे माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे सुपुत्र आहेत. आहेर कुटुंबीयांचा भाजपमध्ये एकूणच असलेला दबदबा पाहता फडणवीस सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास दुस-या इनिंगमध्ये आहेर यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी, नाशिक शहराचा मंत्रिपदाचा पुढचा मान्सूनही कोरडाच जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Web Title: mla from nashik city may not get ministry in upcoming state government hints cm fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.