दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भुसे-महाजनांच्या संघर्षात 'या' मंत्र्याला लागणार पालकमंत्रिपदाची लॉट्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:55 IST2025-01-23T09:30:26+5:302025-01-23T09:55:52+5:30
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भुसे-महाजनांच्या संघर्षात 'या' मंत्र्याला लागणार पालकमंत्रिपदाची लॉट्री?
Nashik Politics: पालकमंत्री नियुक्तीवरून सध्या महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांत जोरदार संघर्ष सुरू आहे. अंतर्गत नाराजीमुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला. रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे व नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यावरून शिंदेसेनेत नाराजीचा सूर उमटू लागला. त्यामुळे शासनाने तातडीने दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीस स्थगिती दिली. परंतु आता नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी कृषीमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. एकीकडे, नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यात संघर्ष सुरू असताना ऐनवेळी कोकाटे आघाडी मारू शकतात. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत नेमकी कोणाची पालकमंत्रिपदी नियुक्ती होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नाशिकमधील राजकीय घडामोडी चर्चेत
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अचानक नाट्यमयरीत्या छगन भुजबळ यांचे नाव मंत्रिमंडळातून वगळले गेले. अर्थात, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्रिपदासाठी इच्छा प्रबळ झाली. त्यांच्यात आणि दादा भुसे यांच्यात दावे प्रतिदावे सुरू असताना कोकाटे यांनी बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री नको असेही म्हटले होते. मात्र, नाशिकला गिरीश महाजन यांनाच नियुक्त करून ॲड. माणिकराव कोकाटे यांनाही पर जिल्ह्यात म्हणजे नंदूरबारचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. परंतु राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या नाराजीनंतर २४ तासांत नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यावरच पालकमंत्रपिदाचा तिढा सुटणार आहे. तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनी गिरीश महाजन यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.