तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 02:19 PM2024-01-17T14:19:05+5:302024-01-17T14:19:53+5:30

मंत्री दादा भुसे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Minister Dada Bhuse has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

लवादाने जो निकाल दिला त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. शेवटची आशा म्हणून थेट जनतेच्या न्यायालयात आलो आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाने माझ्यासोबत येऊन जनतेत उभे राहावे. तिथे त्यांनी सांगावे की शिवसेना कुणाची मग जनताच ठरवेल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रतेसंदर्भातील निकालानंतर हा निकाल कसा लोकशाहीविरोधी आहे, हे पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरळी डोम येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि वकील व्यासपीठावर उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला सभेसारखी गर्दी झाली होती. सुरुवातीला वकिलांनी कायदेशीर बाजू मांडल्या आणि नंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.  

उद्धव ठाकरेंच्या या जनता न्यायलायवर मंत्री दादा भुसे यांनी निशाणा साधला आहे. दादा भुसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. जनता न्यायालयापेक्षा त्याला पक्षाचा मेळावा किंवा सभा म्हणायला हवी होती. काही लोकांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. काही वकील महोदयांनी राजकीय भाषणबाजी केली. तुम्ही सर्वोच्च न्यायालयावर देखील टीका केली. म्हणजे तुम्ही सर्वोच्च झाला का?, असा सवालही दादा भुसे यांनी उपस्थित केला. 

२०१३चा महत्त्वाचा ठराव

२३ जानेवारी २०१३ ला वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. पक्ष घटनादुरुस्तीचे ठराव मांडले होते. यावेळी शिवसेनाप्रमुख पद गोठविण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात आले.  शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे ‘वर्किंग प्रेसिडेंट’ हे पद यापुढे रद्द करण्यात आले. हे सर्व ठराव तत्कालीन ठाकरे गटात असलेले नेते माजी मंत्री रामदास कदम तसेच खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले असल्याचेही यावेळी व्हिडीओतून दाखवण्यात आले. २०१८ साली एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवडही दाखविण्यात आली.

Web Title: Minister Dada Bhuse has criticized former Chief Minister Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.