Mela Saraswat's: Literary convention to be held from March 26 to 28? | मेळा सारस्वतांचा : २६ ते २८ मार्चदरम्यान रंगणार साहित्य संमेलन?

मेळा सारस्वतांचा : २६ ते २८ मार्चदरम्यान रंगणार साहित्य संमेलन?

नाशिक  : गोदातीरावरील भूमीत रंगणारे ९४ वे साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात २६ ते २८ मार्चदरम्यान होण्याची चिन्हे आहेत. या संमेलनाच्या तारखांची अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. 

नाशिकला होणारे हे तिसरे साहित्य संमेलन असून, यंदाचे संमेलन हे कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या संमेलनासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब ही रसिक आणि साहित्यिकांची सुरक्षितता राहणार आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनाची तारीख मार्च महिन्यात अधिकाधिक अखेरच्या टप्प्यात ठेवण्याचे नियोजन  महामंडळाने केले आहे. त्यातही साहित्य रसिकांच्या दृष्टीने शुक्रवार ते रविवार हा कालावधी नेहमीच सोयीस्कर ठरत असल्याने यंदाच्या साहित्य संमेलनासाठीही शुक्रवार (२६ मार्च) ते रविवार (२८ मार्च) या कालावधीतच संमेलन रंगण्याची चिन्हे आहेत. 

२६ मार्चला ध्वजारोहण, ग्रंथदिंडी आणि साहित्य संमेलनाचे उद्घाटन, २७ मार्चला विविध परिसंवाद, चर्चा, कवी संमेलन आणि २८ मार्चला साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. २८ मार्चला होळीसह रविवार आणि २९ मार्चला धूलिवंदनाची सुट्टी असल्याने बाहेरगावच्या रसिकांसाठीही या तारखा सोयीस्कर ठरणार असल्याने त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.  मराठी रसिकांचे दैवत असलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या टिळकवाडीतील निवासस्थानापासून ग्रंथदिंडीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच या ग्रंथदिंडीत ग्रंथांच्या पालखीसह नाशिकच्या परिघातील आदिवासी परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या बोहाडा नृत्यासह लोककलांचेदेखील दर्शन घडविण्यात येणार आहे. 

साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण विभागीय केंद्रांवर
कोरोनामुळे आसन व्यवस्थादेखील एक आसनाची जागा सोडून होणार आहे. संमेलनाचा लाइव्ह आनंद अधिकाधिक रसिकांना घेता यावा, यादृष्टीने राज्यातील सर्व विभागांच्या शहरांमधील मुख्य सांस्कृतिक केंद्रांवर भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण करण्याचा आयोजक लोकहितवादी मंडळाचा मानस आहे.

संमेलनाध्यक्ष होण्यासाठी भारत सासणे उत्सुक -
मराठवाडा साहित्य परिषदेकडून संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संमेलनाध्यक्ष होण्यासाठी आपण होकार दिल्याचे सासणे  यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 सासणे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच याविषयीची विचारणा झालेली होती आणि त्यांच्याकडून प्रस्ताव येताच मी नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या प्रस्तावाला होकार कळविलेला होता. 

सासणे यांच्यासोबतच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संत आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, विचारवंत जनार्दन वाघमारेंकडूनही संमेलनाध्यक्षाच्या प्रस्तावासाठी होकार आलेला आहे. 

साहित्य महामंडळाचे मौन -
- घटक संस्था आणि संलग्न संस्थांनी संमेलनाध्यक्ष पदासाठीची त्यांची प्रस्तावित नावे साहित्य महामंडळाकडे २० जानेवारीपर्यंत पाठवायची होती. 
- किती नावांचे प्रस्ताव आले आहेत, याविषयी विचारणा केली असता साहित्य महामंडळाने यावर मौन बाळगणेच पसंत केले. 
- याविषयीचा खुलासा नाशिक येथे होणाऱ्या बैठकीतच केला जाईल, असे साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mela Saraswat's: Literary convention to be held from March 26 to 28?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.