पाणीप्रश्न सुटेपर्यंत सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:11 IST2018-10-06T01:10:54+5:302018-10-06T01:11:05+5:30
महापालिकेच्या पूर्व प्रभागातील प्रभाग क्र मांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्व सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी (दि. ५) पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत सभात्याग केला.

पाणीप्रश्न सुटेपर्यंत सभात्याग
इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभागातील प्रभाग क्र मांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्व सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेत शुक्रवारी (दि. ५) पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत सभात्याग केला.
पूर्व प्रभाग सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ५) सभा झाली. यावेळी गेल्या तीन सभेत एकही विषय विषयपत्रिकेवर न आल्याने अधिकारीवर्ग कामे करीत नसल्याचा आरोप सय्यद मुशीर यांनी केला. शहरात चिकुनगुनियासदृश, डेंग्यूसदृश आणि स्वाइन फ्लू आजारासाठी आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने अद्यापही नियंत्रणात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. औषध व धूर फवारणी फक्त ‘रोड शो’ ठरत असल्याचा आरोप सुषमा पगारे यांनी केला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी लावण्यात आलेली घसरगुंडी खेळणी अर्धी तुटल्याने संबंधित विभागाने तेवढीच काढून नेली, त्यामुळे लहान बालके अद्यापही अर्धवट तुटलेल्या घसरगुंडीवर खेळत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आशा तडवी यांनी वर्तविली. प्रभाग ३० मधील अनेक ठिकाणी केरकचरा उचलला जात नाही त्यातच डेंगू सदृश्य आणि चिकन गुनिया सदृश्य आजाराचे रु ग्ण वाढत चालले आहे मग कार्यक्षम आयुक्त नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष का देत नाही? असा प्रश्न सतीश सोनवणे यांनी केला.
पांडवनगरी, श्रद्धाविहार कॉलनी, एकता कॉलनी, राजीवनगर याच संपूर्ण प्रभागात गेल्या तीन वर्षांपासून कृत्रिम पाणीटंचाई पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे निर्माण होत असल्याने संतप्त झालेले प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी या तिघांनी सभागृहात जोपर्यंत कृत्रिम पाणीटंचाई
संपत नाही, तोपर्यंत सभागृहात
येणार नाही असे म्हणत सभात्याग करीत प्रशासनाचा निषेध केला.
कृत्रिम पाणीटंचाई
प्रभाग क्रमांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अनेकदा आंदोलन करूनही पाणीप्रश्न सुटत नसल्याने प्रभागाच्या तिघेही नगरसेवकांचा शुक्रवारी (दि. ५) संताप झाला. यावेळी सर्व सदस्यांनी त्यांना साथ दिली. तसेच महिला सदस्य तोंडाला मास्क लावून सभेत बसले होते.