शेतकरी समन्वय समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:47 IST2020-12-16T20:33:16+5:302020-12-17T00:47:25+5:30
देवळा : विकेल तेच पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभिमान राबविण्यासंदर्भात देवळा तालुका शेतकरी समन्वय समितीची बैठक झाली. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

शेतकरी समन्वय समितीची बैठक
कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा, ठरावीक रस्त्यालगतच्या गावातील शेतकऱ्यांचा शेतीमाल, भाजीपाला विकण्याची व्यवस्था करण्यात यावी, त्यांना निवारा, छत्र्या, वजनकाटे, टेबलखुर्च्या, पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशा अनेक विषयांवर चर्चा घेण्यात आली. तालुक्यातील शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांचे गट आत्मा तसेच शेतकरी कंपनीद्वारे विक्रीसाठी जोडण्यात येणार आहे.
तालुका स्तरावर गठित करण्यात आलेल्या शेतकरी समन्वय समिती तसेच सामाजिक व सहकारी संस्थांचे सहकार्य व मार्गदर्शन घेण्यात यावे, असे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले. याशिवाय पीकविमा, अतिवृष्टी नुकसानभरपाई, वीजपुरवठ्याची वेळ याबाबत शेतकरी प्रतिनिधींनी माहिती घेतली. तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत पवार, शेतकरी प्रतिनिधी कुबेर जाधव, विनोद देवरे, निवृत्ती देवरे, रूपेश खेडकर, भरत सावंत, बाजार समिती सचिव माणिकराव निकम यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.