मनमाड आगाराला पांडुरंंग ‘पावला’!
By Admin | Updated: August 3, 2015 22:50 IST2015-08-03T22:48:56+5:302015-08-03T22:50:03+5:30
आषाढी वारी : पंढरपूर फेऱ्यांमधून पावणेसात लाखांचे उत्पन्न

मनमाड आगाराला पांडुरंंग ‘पावला’!
मनमाड : तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठलाच्या भेटीसाठी आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त एस. टी. महामंडळाच्या मनमाड आगाराने भाविकांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या विशेष बससेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला. सात दिवस सुरू असलेल्या या विशेष पंढरपूर फेऱ्यांमधून आगाराला तब्बल पावणेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याने मनमाड आगाराला पांडुरंग पावला आहे.
रेल्वेचे जंक्शन व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मनमाड बसस्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी पाहता मनमाड आगाराचे व्यवस्थापक दिलीप नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर यात्रेसाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.
पसिरातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह अन्य ठिकाणाहून
रेल्वेने मनमाड जंक्शन स्थानकावर आलेले प्रवाशी एस. टी. बसने पंढरपूरला जाणे पसंत करतात. ही बाब हेरून प्रवाशांना बससेवेकडे आकर्षित करण्यासाठी आगाराचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत होते. वेळोवेळी यात्रेसाठी सुटणाऱ्या गाड्यांबाबत उद्घोषणा कक्षावरून सतत माहिती देण्यात येत होेती. पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या बसफेऱ्यांची माहिती प्रवाशांना मिळावी यासाठी स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करण्यात आला होता. यात्रेसाठीच्या प्रवाशी वाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आगाराला यश मिळाले.
दि. २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीमध्ये आगाराच्या ११ बसेसने पंढरपूरच्या १२५ फेऱ्या केल्या. यामध्ये ७७२३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या सर्व यात्रा फेऱ्यांमधून आगाराला सहा लाख ८९ हजार २९१ रुपयांचे उत्पन्न मनमाड आगाराला मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पंढरपूर प्रवाशांच्या संख्येत ९९२ ने, तर उत्पन्नामधे एक लाख ४० हजार रुपयांची वाढ झाली आहे. (वार्ताहर)