Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:05 IST2025-11-21T15:02:48+5:302025-11-21T15:05:55+5:30
तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचे शुक्रवारीही पडसाद उमटले. मालेगावात आंदोलन करण्यात आले होते, मात्र आंदोलक हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
Malegaon Dongrale News: मालेगाव तालुक्यातील एका गावात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला तातडीने कठोरता कठोर शिक्षणा देण्याच्या मागणीसाठी मालेगाव बंद पाळण्याबरोबरच मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी न्यायालयातच शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवावे लागले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
तीन वर्षाच्या मुलीवर एका २३ वर्षीय आरोपीने आधी अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली. या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (२० नोव्हेंबर) आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवून आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शुक्रवारीही अशीच परिस्थिती निर्माण झाली.
मालेगाव बंदची हाक देत मोर्चा काढण्यात आला. यात मंत्री दादा भुसे यांच्यासह इतर पक्षांचे नेते आणि लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा मालेगाव न्यायालयाच्या परिसरात आला. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलकांनी न्यायालयात शिरण्याचा केला प्रयत्न
आंदोलक न्यायालयाच्या समोर आले. त्यानंतर काही आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षण भिंतीवरून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आवरणे नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक न्यायालय परिसरातून पांगले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
आरोपीला व्हीसी द्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले
या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला लोकांमुळे न्यायालयात आणण्याचे टाळण्यात आले. आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनोज जरांगे पाटलांनीही व्यक्त केला संताप
"कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला आजतागायत फाशी झालेली नाही. आपण या प्रकरणात स्वतः सरकारपर्यंत जाऊन प्रश्न उपस्थित करणार आहोत. महाराष्ट्रात बालिकांवर अत्याचारांची मालिका सुरू असून, सरकारने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलनाचे पडसाद उमटतील", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकारला दिला आहे.