मालेगावी बंदला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 01:49 AM2021-11-13T01:49:30+5:302021-11-13T01:49:57+5:30

त्रिपुरा येथे मुस्लिम समाजाच्या नागरिकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचे पडसाद शुक्रवारी (दि. १२) मालेगाव येथे उमटून विविध मुस्लिम संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. दुपारपर्यंत बंद शांततेत पाळला जात असताना सायंकाळी किदवई रोडसह जुना आग्रारोडवर जमावाने दगडफेक सुरू केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यासह लाठीचार्ज करावा लागला. यावेळी दगडफेकीत पोलिसांच्या दंगानियंत्रण पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले तर ३ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जवानदेखील जखमी झाले.

Malegaon Bandla Galbot | मालेगावी बंदला गालबोट

मालेगावी बंदला गालबोट

googlenewsNext
ठळक मुद्देजमावाकडून दगडफेक : पोलिसांकडून लाठीमार, १० कर्मचारी जखमी

मालेगाव/ नाशिक : त्रिपुरा येथे मुस्लिम समाजाच्या नागरिकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचे पडसाद शुक्रवारी (दि. १२) मालेगाव येथे उमटून विविध मुस्लिम संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. दुपारपर्यंत बंद शांततेत पाळला जात असताना सायंकाळी किदवई रोडसह जुना आग्रारोडवर जमावाने दगडफेक सुरू केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यासह लाठीचार्ज करावा लागला. यावेळी दगडफेकीत पोलिसांच्या दंगानियंत्रण पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले तर ३ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जवानदेखील जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ रजा अकादमीसह अन्य मुस्लिम संघटनांकडून शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार मालेगावी सुन्नी जमेतुल उलमा व रजा अकॅडमीसह मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता. त्यामुळे मालेगावच्या पूर्व भागात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. दुकाने बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. सकाळपासूनच गजबजणारा किदवई रोड सुनासुना होता. दुपारपर्यंत बंद शांततेत पार पडलेला असताना सायंकाळी या बंदला दगडफेकीने गालबोट लागले. अचानक शहरातील काही तरुणांचे जथ्थे एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमाव जमू लागला. सुमारे ४०० ते ५०० लोकांचा जमाव जमला होता. याचवेळी किदवई राेडसह जुना आग्रारोडवरील परिसरात दगडफेकीला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली. परिसरात घबराट पसरली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करत काही दुकानांच्या काचाही फोडल्या. याशिवाय दंगा नियंत्रण पथकाच्या वाहनावरही दगडफेक केली. घटनास्थळी तत्काळ अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे यांनी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली. शहरात ५०० पोलीस कर्मचाऱ्यांसह दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

इन्फो

चौघांना घेतले ताब्यात

सुमारे ४०० ते ५०० जणांचा जमाव जमून त्याने दगडफेकीला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. जमावाने काही दुकानांच्या काचा फोडतानाच गाड्यांवरही दगडफेक केली. जमाव किदवाई रोडवरील शहिदोंकी यादगार मनोऱ्याजवळ आला होता. जमाव घोषणाबाजी करीत होता तर पोलिसांनी लोखंडी जाळ्या लावून वाहतूक बंद केली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

कोट

मालेगाव येथील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्याठिकाणी दंडाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

 

कोट...

 

त्रिपुरातील घटना दु:खदायक आहे. त्याचा निषेधच आहे. या देशात काही लोक जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांना बळी पडता कामा नये. मालेगावतील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस तैनात आहेत. लोकांनी शांतता पाळावी.

 

- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक जिल्हा

 

फोटो- १२ मालेगाव दगडफेक ३,५,६

Web Title: Malegaon Bandla Galbot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.