महाराष्ट्राला संत संस्कारांची गरज
By Admin | Updated: April 9, 2015 00:15 IST2015-04-09T00:15:15+5:302015-04-09T00:15:40+5:30
रामकृष्ण लहवितकर : एन. एम. आव्हाड अभीष्टचिंतन व पुस्तक प्रकाशन सोहळा

महाराष्ट्राला संत संस्कारांची गरज
नाशिक : वाढलेला भ्रष्टाचार व व्यभिचार रोखण्यासाठी देशाला विशेषत: महाराष्ट्राला संत संस्कारांची गरज आहे. त्यासाठी सकस संत साहित्याची निर्मिती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केले.
सावरकरनगर येथील मते नर्सरी येथे ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांचा अभीष्टचिंतन सोहळा व ‘चेतन चिंतामणीचा ठाव’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. लहवितकर म्हणाले की, त्याकाळी संत साहित्याच्या माध्यमातून समाजाला विचार दिला. नंतरच्या काळात यामध्ये खंड पडल्याने भ्रष्टाचार, व्यभिचार वाढला आहे. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून संत साहित्याची निर्मिती व्हायला हवी.
एन. एम. आव्हाड यांच्या पुस्तकात अध्यात्म आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घातली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शांताराम बनकर आदि उपस्थित होते. दरम्यान, यावेळी एन. एम. आव्हाड यांचा सपत्निक अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार आदि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)