Nashik Mumbai Highway Accident: मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एका कारचा भयंकर अपघात झाला. शहापूर तालुक्यातील कसाराजवळ मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री ही घटना घडली. यात दोन जण जागीच ठार झाले, तर एका व्यक्तीचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. कारमधील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कार मुंबईवरून निघाली होती. कारमध्ये पाच जण होते. मंगळवारी रात्री कसारातील ऑरेंज हॉटेल समोरून जात असतानाच कारचा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात जाऊन पडली.
वेगात असलेल्या कारचा या अपघातात पाठीमागच्या बाजूने चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि इतर कर्मचारी अपघातस्थळी आले. तातडीने त्यांनी कार बाजूला काढली आणि त्यातील जखमींना तातडीने रुग्णालयात नेले.
तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी खर्डी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामुळे वाहने थांबवल्याने वाहतूक कोंडीही झाली होती. मृत आणि जखमींची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.